तैपेई : तैवानच्या आसपास चीनच्या अचानक वाढलेल्या सैन्य हालचालीने पुन्हा एकदा आशिया-प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. ३ नोव्हेंबरला स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत चीनचे ४९ सैन्य विमान, ६ नौदल जहाजे आणि ६ युद्धनौका तैवानच्या जवळ दिसल्याचं तैवानी संरक्षण मंत्रालयाने सांगितले. २०२६ मध्ये आतापर्यंत एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच सैन्य हालचालींची नोंद झाली. याआधी फेब्रुवारीत ४२ चिनी सैन्य विमानांची नोंद झाली होती.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ४९ पैकी ३१ चिनी विमानांनी तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडून तैवानच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केला. ही मध्यरेषा ब-याच काळापासून तैवान आणि चीन यांच्यातील अनधिकृत लष्करी सीमा म्हणून काम करते. मात्र चीन याला अधिकृत सीमा मानत नाही आणि अलीकडच्या वर्षांत त्यांची लष्करी विमाने नियमितपणे ही सीमा ओलांडत आहेत.
हवाई संरक्षण ओळख क्षेत्र हे एखाद्या देशाच्या सार्वभौम हवाई क्षेत्रासारखे नसते. हे एक ओळख क्षेत्र आहे, जिथे संभाव्य सुरक्षा धोके वेळेवर ओळखण्यासाठी येणा-या विमानांवर देखरेख ठेवली जाते आणि त्यांची ओळख पटवली जाते. त्यामुळे हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश करणे हे थेट तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी मानले जाऊ शकत नाही. परंतु मोठ्या संख्येने विमानांनी मध्यरेषा ओलांडल्यामुळे तैवानच्या लष्करी सज्जतेवर निश्चितच दबाव वाढतो. त्यात चिनी विमाने, जहाजांच्या हालचाली पाहता तैवाननेही आपली सैन्य विमाने, नौदले आणि मिसाईल देखरेख प्रणाली वाढवली आहे. जेणेकरून कुठल्याही स्थितीत तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाढू शकतो संघर्ष?
नोव्हेंबर-डिसेंबर या काळात तैवानच्या आसपास वाढत्या सैन्य हालचाली पाहता बीजिंग कुठल्या बड्या सैन्य मोहिमेची तयारी करतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ विमाने, जहाजांच्या संख्येच्या आधारे कुठल्याही निष्कर्षावर पोहचणे योग्य नाही. तैवानचा मुद्दा चीन आणि अमेरिका यांच्यातील रणनीती प्रतिस्पर्धेचा सर्वात संवेदनशील विषय आहे. चीन तैवानला त्यांचा भाग मानतो तर तैवान आपली स्वातंत्र्य राजकीय व्यवस्था, प्रशासन असल्याचा दावा करते.
















