26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रमराठीचा सन्मान वाढविणार

मराठीचा सन्मान वाढविणार

व्यापक प्रयत्नांची उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, संमेलनाचा समारोप

स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : विनायक कुलकर्णी

राज्यात हिंदी भाषा सक्ती केली जाणार नाही, याचा पुनरुच्चार करून यापुढील काळात मराठीचा सन्मान वाढविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून येथे सुरु असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळ अध्यक्ष मिलिंद जोशी, जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई, जेष्ठ लेखक रघुवीर चौधरी, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महामंडळ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आगामी १०० वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही संवादापुरती मर्यादित न राहता रोजगार व्यवसाय, तंत्रज्ञानांची झाली पाहिजे. यासाठी जे जे करावे लागेल ते शासन करणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार आहे. मराठी भाषा ही आपली ओळख, अस्मिता आहे.

यासाठी भाषा विकासावर भर दिला जाणार आहे. संमेलन म्हणजे आपल्या भाषेचा उत्सव होय.साहित्यिकांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली, समाजाला दिशा दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषा मंत्री सामंत यांनी सांगितले की, नजीकच्या काळात अनुवाद समितीची फेररचना करण्यात येणार आहे, त्याची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करण्यात येणार आहे. समिती यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कार्यरत राहणार आहे. तसेच गदिमा यांच्या नावाने माजी संमेलनाध्यक्ष यांना निधी पुढील वर्षापासून उपलब्ध करुन दिला जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
जेष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महामंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले ठराव कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी मांडले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. महामंडळ कार्यवाह विनोद कुलकर्णी यांनी स्वागत केले तर स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विविध मुद्यांना स्पर्श करून भूमिका मांडली.

१०० वे साहित्य संमेलन पुण्यात
महामंडळ अध्यक्ष जोशी यांनी सांगितले की, आगामी १०० वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असून त्याचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच आगामी मराठी विश्व साहित्य संमेलन दुबई येथे होणार असल्याचेही जाहीर केले.

भाषेसाठी लेखक, संस्थांच्या पाठीशी शासन हे उत्तम चित्र
महाराष्ट्रात साहित्य संस्थांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, ही मराठी भाषेसाठी उत्तम गोष्ट आहे. भाषेसाठी साहित्यसंस्था, लेखक आणि शासन यांनी असे एकत्रित प्रयत्न करत आहेत, हे चित्र दिलासादायक आहे. भाषेसाठी हे अनुकूल वातावरण आहे, अशा अनुकूल वातावरणात भाषेचा विकास होत राहो, अशा शुभेच्छा ज्ञानपीठ सन्मानप्राप्त साहित्यिक प्रा. रघुवीर चौधरी यांनी दिल्या. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील समारोप समारंभात प्रा. चौधरी यांची उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते.

सीमावासीयांचा एल्गार
दारी सीमा भाग जमला, भिक वाढा हो मराठी, दडपशाही सहन करूनी, बोलतो मराठी, असे लिहिलेली पत्रके वाटत आणि बेळगाव, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा लिहिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची नाव असलेली टोप्या घातलेल्या सीमा भागातील मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR