मुंबई : प्रतिनिधी
राज्यामध्ये जाणवणा-या इंधन टंचाईच्या संकटामुळे उद्योगधंदे आणि शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. या इंधन टंचाईमुळे शालेय वाहतूक व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू असतानाच डिझेल आणि पेट्रोलच्या दरांनी डोकेदुखी वाढवली आहे, याचा थेट परिणाम आता शाळांच्या कामकाजावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधन टंचाई आणि वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी मुंबईतील स्कूल बस ओनर्स असोसिएशनने सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे.
स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा नवा प्रस्ताव
वाढत्या इंधन दरांचा भार पालकांवर पडू नये आणि बस चालकांचे आर्थिक नुकसान टळवे, यासाठी असोसिएशनने ‘दिवसाआड शाळा’ भरवण्याचे मॉडेल सुचवले आहे. या प्रस्तावानुसार, आठवड्यातील ३ दिवस प्रत्यक्ष शाळा आणि २ दिवस ऑनलाईन वर्ग अशा हायब्रीड सिस्टीमचा अवलंब करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे बसच्या फे-या कमी होतील, इंधनाची बचत होईल आणि परिचालन खर्चही मर्यादित राहील, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
एकाच शिफ्टमध्ये शाळा भरवा
सध्या अनेक शाळा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चालतात, त्यामुळे बसला अनेकवेळा ये-जा करावी लागते. यामुळे असोसिएशनने ‘सिंगल शिफ्ट ट्रान्सपोर्टेशन’ प्रणालीचा प्रस्ताव दिला. सर्व शाळांनी मिळून एकच पिकअप आणि एकच ड्रॉप वेळ निश्चित केल्याने बस फे-यांची संख्या कमी होऊन इंधन टंचाईवर मात करणे सोपे जाईल, असा दावा एसबीओए महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे.
पालकांवर फी वाढीचा भार नसणार
स्कूल बस ऑपरेटर सध्या विमा हप्ते, देखभाल खर्च, परवाने, कर्मचा-यांचे पगार आणि विविध टॅक्समुळे आर्थिक दबावाखाली आहेत. इंधनाचे दर असेच वाढत राहिले, तर बसची फी वाढवण्याचाच पर्याय असेल. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकायची आमची इच्छा नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
सरकारकडे सवलतीची मागणी
शालेय बस ऑपरेटर दररोज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करतात. कठीण काळात ज्याप्रमाणे विमान सेवा किंवा इतर वाहतूक क्षेत्राला सवलती दिल्या जातात, तशाच प्रकारे स्कूल बस क्षेत्रालाही इंधन सबसिडी किंवा इतर सवलती देऊन सरकारने दिलासा द्यावा, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. विद्यार्थी, शाळा, पालक आणि बस चालक अशा सर्व घटकांसाठी ‘विन-विन’ ठरेल असा तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला करण्यात आले आहे.
नागपुरात स्कूल बसची भाडेवाढ होणार
दुसरीकडे, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागपूर स्कूल बस व स्कूल व्हॅन संघटनेने आपल्या सेवा शुल्कात तब्बल १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा जे पालक दरमहा १ हजार भाडे देतात, त्यांना यापुढे १२०० रुपये, तर २ हजार रुपये भाडे देणा-या पालकांना २४०० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही या इंधनदरवाढीमुळे निर्माण झालेल्या महागाईचा फटका बसणार आहे.
















