नागपूर : प्रतिनिधी
एसटी महामंडळातील कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे बोनस लागू नाही. त्यामुळे दरवर्षी दिवाळीनिमित्त त्यांना दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र, वाढत्या महागाईच्या तुलनेत मिळणारी रक्कम अपुरी असल्याने यंदा प्रत्येक एसटी कर्मचा-याला १५ हजार रुपये दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना एसटी कर्मचा-यांना यंदा १५ हजार रुपयांची दिवाळी भेट मिळणार का, याकडे राज्यभरातील कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे. वाढती महागाई आणि अपु-या मनुष्यबळात कामाचा वाढलेला ताण लक्षात घेता एसटी कर्मचा-यांना १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, तसेच रखडलेला महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशा दोन प्रमुख मागण्या महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनने केल्या आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारी कर्मचा-यांना लागू असलेल्या ६० टक्के दराने महागाई भत्ता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कर्मचा-यांप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचा-यांनाही वेळोवेळी महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे. मात्र, महामंडळाकडून हा भत्ता वेळेवर दिला जात नसल्याची तक्रार फेडरेशनने केली आहे. त्यामुळे महागाई भत्ता नियमितपणे लागू करावा आणि त्याची थकीत रक्कम एकरकमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
६० टक्के महागाई भत्ता लागू करण्याची मागणी
सध्या राज्य सरकारी कर्मचा-यांना ६० टक्के महागाई भत्ता मिळत असल्याचा दाखला देत एसटी कर्मचा-यांनाही त्याच दराने भत्ता लागू करावा, अशी भूमिका फेडरेशनने मांडली आहे. केवळ भत्ता जाहीर करून उपयोग नाही, तर त्याचा आर्थिक लाभही कर्मचा-यांना एकरकमी मिळावा, असे निवेदनात नमूद आहे.
मंत्र्यांकडे निवेदन; निर्णयाकडे लक्ष
परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना २२ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत, अपु-या मनुष्यबळात एसटी कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यांच्या योगदानाचा विचार करून दोन्ही मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अजय पाटले आणि महामंत्री बृजमोहन फड यांनी केले आहे.
















