हेग : कोरोना, जागतिक संघर्ष, पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तींचे दशक ठरले आहे. या परिस्थितीत लवकर बदल केला नाही तर गेल्या अनेक दशकांतील प्रगतीवर विपरित परिणाम होऊ शकतो व मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीच्या खाईत ढकलली जाऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नेदरलँडमधील हेग येथे दिला.
तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारत ही अनेक संधींची भूमी आहे. आपल्या देशात अभूतपूर्व परिवर्तन सुरू आहे. भारताच्या आकांक्षा आता केवळ देशाच्या सीमांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. देशाकडे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप नेटवर्क आहे. आपल्या स्टार्टअप्स एआय, संरक्षण व अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत.
मोदी यांनी सांगितले की, देशात संशोधन आणि नवोन्मेषाची संस्कृती अधिक विस्तारत आहे. तसेच लोकशाही मजबूत होत असून, विविध राज्यांतील निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी वाढत आहे.
झालमुडी हेगमध्येही पोहोचला आहे का?
झालमुडी हा खाद्यपदार्थ हेगमध्येही पोहोचला आहे का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेदरलँडमधील भारतीयांना विचारून विरोधी पक्षांना टोला लगावला. मोदी म्हणाले की, अनेक संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाल्या, पण भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवारी नेदरलँड्समध्ये दाखल झाले. त्यांच्या पाच देशांच्या दौ-याच्या दुस-या टप्प्यात व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात आहे.
















