नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताचा विकास दर भविष्यात आणखी घटणार असल्याचा अंदाज फिच या रेटिंग एजन्सीने वर्तवला आहे. यासोबतच महागाईचा भडका उडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. युद्धाच्या कारणामुळे वाढत्या किमती लोकांच्या वास्तविक उत्पन्नावर परिणाम करत आहेत. यामुळे ग्राहक खर्च म्हणजेच सामान्य ग्राहकांकडून केल्या जाणा-या खर्चात घट होईल. तरीही देशांतर्गत भांडवली खर्चात मजबूत वाढ कायम आहे.
रेटिंग एजन्सीनुसार आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुस-या (सप्टेंबर) आणि तिस-या (डिसेंबर) तिमाहीत आर्थिक मंदी सर्वाधिक दिसून येईल. स्ट्रेट ऑफ होर्मुज गेल्या १४ आठवड्यांपासून बंद आहे. फिचने अंदाज व्यक्त केला आहे की, ती जुलैपूर्वी उघडणार नाही. याच तेल संकटामुळे फिचने २०२६ सालासाठी ब्रेंट क्रूड तेलाच्या सरासरी किमतीचा अंदाज ७० डॉलर प्रतिबॅरलवरून वाढवून ८७ डॉलर्स प्रतिबॅरल केला. अलीकडील आठवड्यांमध्येच इंधनाच्या किमती ४-५% पर्यंत वाढल्या आहेत. फिचने म्हटले आहे की, आम्हाला अपेक्षा आहे की, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये जीडीपी वाढ ६.४ टक्क्यांपर्यंत कमी होईल, जी आमच्या मार्चच्या अंदाजानुसार ०.३ टक्के कमी आहे. तरीही देशांतर्गत मागणीच या वाढीची मुख्य चालक राहील.
भारतात सध्या ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई ३.५ टक्के आणि घाऊक महागाई एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर ८.३% राहिली आहे. जरी किरकोळ महागाई अजून खूप वाढली नसली तरी दबाव मात्र सातत्याने वाढत आहे. बेस इफेक्ट आणि महागड्या ऊर्जेमुळे या कॅलेंडर वर्षाच्या अखेरपर्यंत महागाई दर वाढून ५.३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. या व्यतिरिक्त, देशाच्या काही भागांमध्ये सुरू असलेली उष्णतेची लाट आणि सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजानेही महागाईचा धोका वाढवला आहे.
आरबीआयकडून धोरणात बदल?
महागाईच्या वाढत्या दबावामुळे फिचचे मत आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या धोरणात बदल करू शकते. तथापि, एप्रिलच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर ५.२५ टक्केच स्थिर ठेवला होता. परंतु फिचनुसार, पुरवठा धक्क्यामुळे निर्माण झालेल्या किमतीच्या दबावाला तोंड देण्यासाठी आरबीआय या वर्षी व्याजदरात एकदा वाढ करून तो ५.५ टक्क्यांपर्यंत करू शकते. गेल्या आठवड्यातच आरबीआयने देशाच्या वाढीचा अंदाज कमी करून ६.६% केला होता आणि महागाई दर ५.१ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता.
रुपयाची घसरण
आता थांबणार?
फिचच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या उर्वरित महिन्यांत भारतीय रुपयामध्ये मोठ्या अवमूल्यनाची शक्यता नाही. चालू आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर सरासरी ९७.५० च्या पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे.
जागतिक विकास दर घटणार?
फिचने २०२६ सालासाठी जागतिक विकास दराचा (ग्लोबल ग्रोथ) अंदाजही ०.२ टक्क्यांनी कमी करून 2.४ टक्के केला. फिचचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ ब्रायन कुल्टन म्हणाले की, तेलाच्या किमतींच्या धक्क्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे.
















