वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेत ट्रेड डील बाबत आतापर्यंत सहावेळा चर्चा झाली आहे. पण अद्यापपर्यंत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प अधून-मधून दोन्ही देशांमध्ये पॉझिटिव्ह डील होणार असं सांगत असतात. एका परदेशी संस्थेने सुद्धा भारत-अमेरिकेत ट्रेड डील लवकर पूर्ण होईल असे म्हटले आहे. भारतावर सध्या लागू असलेला ५० टक्के टॅरिफ कमी होऊन २० टक्के होऊ शकतो असा अंदाज आहे.
नोमुराने इंडिया-यूएस ट्रेड डीलवर मोठी अपडेट दिली आहे. अमेरिका-भारतादरम्यानच्या व्यापार कराराबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. दोन्ही बाजूंकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. पण अजून करारावर सही होत नाहीय. नोमुरा या परदेशी ब्रोकरेज फर्मनुसार, लवकरच या ट्रेड डीलवर स्वाक्षरी होईल आणि भारतावरील टॅरिफ २० टक्क्याच्या आसपास निश्चित होईल. सध्या ५० टक्के टॅरिफ आहे. ब्रोकरेज फर्मनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही देशांमध्ये ट्रेड डील होईल.
भारतीय अर्थव्यवस्थेचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा चांगला
परदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल म्हटले की, सकल देशांतर्गत उत्पादनाचा विकास दर सप्टेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर ८.२ टक्के होता. जून तिमाहीत हाच दर ७.८% होता. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा चांगला आहे. म्हणूनच एफवाय२६ साठी नोमुराने आपला जीडीपी ग्रोथ ७ टक्क्याने वाढवून ७.५ टक्के केला आहे.
विकास दर १.२ टक्क्याने जास्त
इंडिया जीडीपी विकास दर आरबीआयचा तिमाही अंदाज ७ टक्के होता. त्यापेक्षा विकास दर १.२ टक्क्याने जास्त आहे असे नोमुराने म्हटले आहे. नव्या जीडीपी आकड्यांवर नजर टाकली, तर भारतीय अर्थव्यवस्था मजबुतीने पुढे जात आहे. अशावेळी पॉलिसी रेट्समध्ये कपात करण्याची काही आवश्यकता नाही. ब्रोकरेज फर्मनुसार, महागाई दर, जीएसटी रिफॉर्म आणि श्रम कायदे सोपे बनवण्यासारख्या सुधारणांमुळे ग्रोथला चालना मिळेल.
रेपो रेटमध्ये कपात होईल का?
काही दिवसात भारतीय रिझर्व्ह बँकेची एमपीसी बैठक होणार आहे. मजबूत जीडीपीमुळे रेपो रेटमध्ये २५ पॉइंटची कपात होईल असा अंदाज आहे. त्यावर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण २५ पॉइंटची कपात होईल या अंदाजावर आम्ही ठाम आहोत. त्यानंतर रेपो रेट कमी होऊन ५.२५% होऊ शकतो.

