मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगलेली आहे. याआधी अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसलेले आहेत. अशातच आता हे दोन्ही नेते उद्या म्हणजेच सोमवारी (२२ सप्टेंबर) पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वास्तूचे उद्या उद्घाटन होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचा शुभारंभ होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनाही देण्यात आलेले आहे. त्यामुळे उद्या दोन्ही नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष युती करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून रंगलेली आहे. मात्र अद्याप युतीचा कोणताही निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी या युतीची इच्छा व्यक्त केलेली आहे. तसेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना एकत्र काही मोर्चांमध्येही सहभाग घेतलेला आहे.
















