मुंबई : प्रतिनिधी
गेल्या १२ वर्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून तरुण वर्ग, विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ते मोदीझ्रशहांच्या दहशतीला व पोलिसांच्या दडपशाहीला घाबरत नाहीत. उलट सरकार त्यांना घाबरून लपून बसले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने लोकशाहीचे अपहरण केले गेले. देशातील १३ कोटी मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. यामुळे देशातील तरूणाई त्यांच्या हक्कासाठी, सत्ताबदल करण्यासाठी रस्त्यावर उतरली असून आता ही लोन थांबणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे. आम्ही जेन झीच्या सोबत आहोत. दाद मागून प्रश्न सुटत नसेल मग कोणी रस्त्यावर उतरले तर त्याला तुम्ही नक्षलवादी म्हणता. हे तरूण रस्त्यावर उतरत आहेत ते नक्षलवादी नाहीत तर क्रांतीकारी आहेत. आज महाराष्ट्र हे शहरी नक्षलवादाचे केंद्र बनल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
दिल्लीत ही सगळी मुलं रस्त्यावर उतरली तेव्हा त्यांच्यावर पोलीस लांडग्यासारखे तुटून पडले. गुराढोरासारखे मुलांना मारले. पण या मुलांना समजून घेतले नाही तर परिस्थिती फार वाईट होईल. बारा वर्षे मोदी-शहांनी देशाला छळले. देशाची आर्थिक वाट लावली. त्याचे फळ तुम्हाला चाखावेच लागेल. अफजलखानाने देखील महाराजांचा त्यावेळी चूहा म्हटले होते. पण महाराजांनी त्याचे पोट फाडले. आज हेच या तरूणाईला झुरळ म्हणत आहेत. तरूणाई यांना दाखवेलच. अभिजित दिपकेला मी सगळयात पहिला पाठिंबा राजकीय पक्ष म्हणून मी दिला. आजही तो कायम आहे. आगे बढो हम तुम्हारे साथ है असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचे हिंदुत्व हे देशभक्तीचे
आमचे हिंदुत्व हे देशभक्तीचे आहे. आज धर्माचे राजकारण सुरू आहे. आज राजाला धर्माचा आश्रय लागतो आहे. हातात नाही काम बोल जय श्रीराम हे आमचे हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे. होय आम्ही कटटर देशाभिमानी हिंदू आहोत. पण कोणी देशभक्त मुसलमान असेल त्याचा रंग हिरवा असेल. देशभक्त बौदध आहेत त्यांचा रंग निळा आहे. पण भाजप तिरंग्याचे रंग वेगवेगळे करायचा प्रयत्न करत आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणतात महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे, गुजरातमध्ये बहुभाषिकता नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्यावेळी मुंबई मिळविण्यासाठी गुजरातने पराकाष्ठा केली. पण मराठी माणसाने रक्त सांडले व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. त्यांना वाटते शिवसेना संपवली की मुंबईचा घास गिळता येईल. पण गिळण्याचा प्रयत्न केला तर पोट फाडून बाहेर आल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपचा संभ्रम घोटाळा
भाजपने गेली बारा वर्षे संभ्रम घोटाळा केला. खोटी अशक्यप्राय स्वप्ने दाखवायची व मते मिळवायची. विरोधकांविरोधात खोटी मोहिम चालवायची. बदनामी करायची. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंगांविरोधात देखील अशीच मोहिम चालवली. मात्र नंतर त्यांची आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली असेही ते म्हणाले.
गददारांना पन्नास खोके, शेतक-यांना पाच हजार !
गददारांना पन्नास खोके देता आणि शेतक-यांना ५ हजार देता हे दुर्देव आहे. ५ हजाराची मदत हे उत्तर नाही. नमो किसान योजनेचे ४ हजार अदयाप येणे बाकी आहेत. कर्जमाफी जाहीर केली पण किती लोकांना मिळाली याचा पत्ता नाही. केंद्रिय पथक येऊन गेले. पण नेमकी मदत किती आणि कोणाला मिळणार याची माहितीच नाही. शाळेच्या सहलीचे पैसे नाहीत म्हणून १४ वर्षांच्या युवराज या शेतक-याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असेही ते म्हणाले.
















