25 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeमहाराष्ट्रमहिलेचा वाघाने घेतला बळी

महिलेचा वाघाने घेतला बळी

गडचिरोली : मोह टोळाच्या वेचणीकरता जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना पोर्ला वनपरिक्षेत्राच्या देलोडा (ता. आरमोरी) जंगलात ५ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. मीरा आत्माराम कोवे (५५, रा. सुवर्णनगर, देलोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

मीरा कोवे या सकाळी १० वाजताच्या सुमारास जेवण करून गावाला लागून असलेल्या जंगलातील कक्ष क्र. (१०) मध्ये टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या. टोळी वेचण्यात त्या मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. पोर्ला ते वडधा मार्गावरून ये-जा करणा-या नागरिकांना वाघाचे दर्शन झाले तेव्हा बराचवेळ उलटूनसुद्धा महिला घरी परत आली नाही म्हणून कुटुंबाला संशय आला. जंगल परिसरात दुपारी ४ वाजताच्या सुमारास शोधाशोध सुरू केली असता, मीरा कोवे यांचा मृतदेह आढळला. वन विभागाने पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पती, दोन मुलांच्या मृत्यूनंतर एकट्याच होत्या
मीरा कोवे यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. तर चार वर्षांपूर्वी मोठ्या मुलाचा आजारपणात मृत्यू झाला, तर दोन वर्षापूर्वी धाकट्या अविवाहित मुलानेही आजारपणात प्राण सोडले. मीरा कोवे या सून व दोन लहान नाती यांच्यासह राहात होत्या. जेमतेम दीड एकर शेतीवर त्यांची गुजराण होती. त्यामुळे पती, दोन मुलांच्या जाण्याचे दु:ख पचवत त्या मोलमजुरी व हंगामात मोहफुले, मोह टोळी वेचणी करून कुटुंबाचा गाडा हाकत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR