श्रीनगर : तब्बल १३४ वर्षांनी काश्मीरवासींच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे. जम्मू ते श्रीनगर या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. तसेच सर्वांत उंच चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांनी केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौ-यावर गेले.
जम्मू-उधमपूर-बारामुल्ला रेल्वे मार्गाची आखणी केंद्र सरकारने केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा मार्ग जम्मू आणि काश्मीरचे महाराज प्रताप सिंह यांनी १८९० सालीच तयार करायला सुरुवात केली होती. मात्र, देशाच्या फाळणीमुळे या प्रस्तावावर पुढे काम होऊ शकले नाही. भारतीय अभियंत्यांनी उथमपूरहून काश्मीरमधील बारामुल्लापर्यंत रेल्वे नेण्यासाठी ज्या मार्गाचा सर्वेक्षण केला, तोच मार्ग महाराजांच्या काळातही निवडण्यात आला होता. या रेल्वेची मूळ योजना तब्बल १३४ वर्षापूर्वीची आहे. परंतु, आता जम्मू ते श्रीनगर मार्ग प्रत्यक्षात जोडण्यात आला आहे.
वंदे भारत ट्रेनने ३ तासांत पोहोचता येणार
जम्मू आणि काश्मीरला जोडणारी कटरा ते बारामुल्ला वंदे भारत ट्रेनमध्ये खास आणि अत्याधुनिक सुविधा आहेत. ही ट्रेन कटरा ते श्रीनगरचा सुमारे ३ तासांचा प्रवास अत्यंत आरामदायी होईल. रेल्वे मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले की, सध्या कटरा ते श्रीनगर या मार्गावर रस्त्याने प्रवासासाठी ६ ते ७ तास लागतात, तर विमान प्रवास एक तासाच्या आत पूर्ण होतो. वंदे भारत ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ व खर्च दोन्हींची बचत होणार आहे. सुरुवातीला ही सेवा फक्त कटरा ते बारामुल्ला या दरम्यानच असेल आणि दररोज एकदाच चालवली जाणार असून मागणीनुसार तिची फेरी व प्रवासाचा विस्तार पुढे वाढवण्यात येईल, असे अधिका-यांनी स्पष्ट केले. ही ट्रेन जम्मूहून चालवली जाणार आहे. काश्मीरमध्ये तापमान अनेकदा शून्याखाली जाते, तरीही ही ट्रेन सुरू राहील. ट्रेनच्या विंडशील्डमध्ये हीटिंग एलिमेंट्स, पाण्याच्या टाक्यांमध्ये सिलिकॉन हीटिंग पेंड्स आणि भारतीय शैलीच्या शौचालयांमध्ये हीटर अशा अनेक सोयी या विशेष वंदे भारत ट्रेनमध्ये करण्यात आलेल्या आहेत. या विशेष वंदे भारत ट्रेनला एकूण डबे असणार आहेत. यामध्ये १ एक्झिक्युटिव्ह क्लास कोच आणि ७ एसी चेयर कार कोचेस असणार आहे. एकूण २७२ किमीचा प्रवास वंदे भारत ट्रेन करणार आहे.
चिनाब पुलामुळे नदीच्या प्रवाहात अडथळा नाही
देशाच्या अन्य भागांशी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला रेल्वेने जोडण्याकरिता दोन पुलांचे विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक आहे तो म्हणजे जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात बांधलेला चिनाब रेल्वे पूल तर दुसरा पूल आहे अंजी खडू पूल. आर्च (मेहराब) तंत्रज्ञानावर आधारित चिनाब पूल चिनाब नदीच्या पृष्ठभागापासून ३५९ मीटर उंचीवर बांधलेला आहे. ही उंची आयफेल टॉवरपेक्षा सुमारे ३५ मीटर अधिक आहे. चिनाब ब्रीजपासून अवघ्या १३ किमी अंतरावर असलेला अंजी खड्ड पूल देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. २००२मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने या चिनाब पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. आता या पुलामुळे कटरा-श्रीनगर रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर काश्मीर खो-यात आरामदायी प्रवास करत लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. चिनाब पुलाच्या बांधकामामुळे नदीच्या प्रवाहात कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही तसेच नदीच्या पात्रात पुलासाठी खांबही उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा पूल पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरला असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले. दरम्यान, चिनाब पुलाचे आयुष्य सव्वाशे वर्षे असेल, असे म्हटले जात आहे. तसेच या पुलाचे बांधकाम करण्यासाठी २२ वर्षे लागली. २००२ मध्ये या पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. २९ हजार मेट्रिक टन स्टील चिनाब पुलासाठी वापरण्यात आले. १०० किमी प्रतितास वेगाने या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर रेल्वे धावू शकते. जोरदार वारे, भूकंप किंवा ३० किलो स्फोटक यांचा त्यावर काहीही परिणाम होणार नाही.