जेजुरी : प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या तीर्थक्षेत्र जेजुरीत सोमवती अमावस्यानिमित्त प्रचंड गर्दी केली होती. सुमारे तीन लाखाहून अधिक भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. दीड वर्षानंतर जेजुरीत सोमवती यात्रा भरत असल्याने भाविकांची गर्दी झाली होती. रविवारी १५ जून रोजी दुपारी १२.२० वाजेपासून अमावस्या सूरु झाली होती. ती आज सोमवारी सकाळी ८.२४ वाजेपर्यंत सोमवती अमावसेचा पर्व काळ असल्यामुळे ग्रामस्थानी रविवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता पालखी सोहळा क-हा स्रानासाठी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रात्री दोन वाजता मानकरी पेशवे यांच्या इशारतीत सोहळ्याने क-हा नदीकडे प्रस्थान ठेवले.
पालखीचे खांदेकरी मानकरी आणि ग्रामस्थांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात पालखी उचलली. यावेळी उपस्थित भाविकांनी भंडार खोब-याची मुक्त हस्ताने उधळण केली. देवाचा जयघोष आणि भंडार खोब-याच्या उधळणीत पालखी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत बालदारीत नेण्यात आली.
या ठिकाणी देवाचे पुजारी उपाध्ये यांनी कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांताच्या उत्सवमूर्ती विधिवत बालदरीत आणल्या. त्या ठिकाणी उत्सव मूर्तिना पालखीत स्थानापन्न करण्यात आले. यानंतर देवाचा पालखी सोहळा कर्हेकडे निघाला. मुख्य प्रवेश द्वारातून सोहळ्याने गड कोटाबाहेर प्रस्थान ठेवले. नंदी चौकातून सोहळा चिंचबागेतील होळकर ट्रस्ट च्या गौतमेश्वर मंदिरात आला. या ठिकाणी होळकरांचा मान स्वीकारून सोहळा जानाई मंदिर चौक, शहरातील मुख्य शिवाजी महाराज चौक मार्गे शहराबाहेर कोथळे मार्गांवरून कर्हेकडे निघाला. सकाळी सात वाजता सोहळा क-हा नदीवरील रंभाई शिंपीन स्रान घाटावर पोहोचला. येथे उत्सव मूर्तिना विधिवत क-हा स्रान घालण्यात आले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.
















