नवी दिल्ली : मान्सूनच्या परतीचा काळ सुरू झाला आहे. दक्षिण भारतातील ९ राज्यांमध्ये रविवारी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अंदमान समुद्रावर कमी दाबाची एक प्रणाली तयार झाली आहे.
२३ सप्टेंबरच्या सकाळी ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी तिचे ‘डीप डिप्रेशन’मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे ओडिशात मुसळधार पाऊस पडू शकतो. ‘डीप डिप्रेशन’ ही हवामानाची अशी प्रणाली आहे, जी कमी दाबाच्या प्रणालीपेक्षा अधिक तीव्र असते. सामान्यत: ही चक्रीवादळ तयार होण्यापूर्वीची स्थिती असते. याच प्रणालीमुळे ओडिशातील बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रपाडा, जगतसिंहपूर, कटक, ढेंकनाल, पुरी, खुर्दा आणि नयागड जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. दरम्यान, उत्तर प्रदेशात पुरामुळे सुमारे १२ एकर जमीन नद्यांच्या धूपेमध्ये वाहून गेली. छत्तीसगडमध्येही शनिवारी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
हवामान अंदाज २१ सप्टेंबर
आंध्र प्रदेशसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार आणि सोसाट्याच्या वा-याचीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, मराठवाडा, कोकण-गोवा, तामिळनाडू, पुदुचेरी, रायलसीमा, कर्नाटक आणि केरळसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.
हवामान अंदाज २२ सप्टेंबर
ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, मराठवाडा, कोकण-गोवा, तामिळनाडू, पुदुचेरी, रायलसीमा, कर्नाटक, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासाठी पावसाचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. बिहारमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
















