पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्या संबंधांबाबत नवी माहिती आली आहे. केतन सियाचे लग्न ठरण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बुकिंग करून मुक्काम केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये एनआयबीएम रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चेतनने ऑनलाइन बुकिंग केले होते. त्या वेळी त्याला ३०४ क्रमांकाची खोली देण्यात आली. हॉटेलमध्ये दाखल होताना चेतनने स्वत:चे आधारकार्ड, तर सियाचे वाहन चालवण्याचे लर्निंग लायसन्स ओळखपत्र म्हणून दिल्याचे हॉटेलच्या असिस्टंट फायनान्स मॅनेजरने पोलिसांना सांगितले आहे. दुस-या दिवशी दुपारी एकच्या सुमारास चेतन आणि सियाने खोली सोडल्याचेही जबाबात नमूद आहे. पोलिसांनी हॉटेलमधील दोघांच्या ओळखपत्रांच्या प्रती ताब्यात घेतल्या आहेत. यानंतर जानेवारी २०२६ मध्ये गुलटेकडी परिसरातील एका हॉटेलमध्येही दोघांनी बुकिंग करून मुक्काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापकाचाही पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.
तरुणींवर जबरदस्तीचा प्रयत्न
पोलिसांनी महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या दोन तरुणींचेही जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी एक तरुणी लातूरची असून ती पुण्याबाहेरील एका मैत्रिणीसोबत राहत होती. ९ मे २०२६ रोजी दोघी मैत्रिणी एकीच्या प्रियकरासह आणि चेतन चौधरीसोबत एस.बी. रोडवरील एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर दारू खूप प्यायल्याने रात्री उशिरा चौघे मार्केटयार्ड परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामासाठी गेले. मैत्रीण तिच्या प्रियकरासोबत एका खोलीत गेल्यानंतर संबंधित तरुणी चेतनसोबत दुस-या खोलीत गेल्याचे पोलिसांच्या जबाबातून समोर आले आहे. या वेळी चेतनने तिच्याशी रिलेशनशिप ठेवण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दुस-या दिवशी तिने ही बाब मैत्रिणीला सांगितली. तसेच चेतनने आपल्यासोबतही दोन-तीन वेळा रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रयत्न केल्याचे मैत्रिणीने पोलिसांना सांगितले.
















