बिनामुंडा : राष्ट्रीय ध्वज फडकवला म्हणून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिनागुंडा गावात सदर घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी देशाचा स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. मात्र छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात मुनेश नूरूटी या तरुणाची स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावल्याने नक्षलवाद्यांनी हत्या केली. या घटनेने छत्तीसगडमधील बस्तर परिसरात नक्षलवाद्यांच्या क्रूरतेने कळस गाठल्याचे अत्यंत दुर्दैवी प्रसंग समोर आले आहे. बारावी उत्तीर्ण मुनेश नूरूटी गावातील मोजक्या शिक्षित तरुणांपैकी एक होता. त्यामुळे त्याने १५ ऑगस्ट रोजी बिनागुंडा या आपल्या गावातील शाळेत नक्षलवाद्यांच्या दहशतीचा प्रतीक असलेल्या नक्षल स्मारकावरच राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे धाडस केले.
तो व्हीडीओ चित्रित केला गेला आणि नंतर तो व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच ध्वज फडकवल्याचा मुनेश नूरूटीचा हा व्हीडीओ नक्षलवाद्यांपर्यंतही पोहोचला. नक्षलवाद्यांची एक तुकडी दुस-या दिवशी गावात दाखल झाली आणि त्यांनी गावक-यांसमोर जन अदालत भरवली. त्यामध्ये नक्षलवाद्यांकडून राष्ट्रीय ध्वज अभिमानाने फडकवणा-या मुनेशला आरोपी ठरवत पोलिसांचा मुखबीर सांगण्यात आले. जन अदालतमध्ये मुनेशला दोषी ठरवत मृत्युदंड देण्यात आले. नक्षलवाद्याने त्याच दिवशी मुनेशची गळा आवळून हत्या केली.
राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे मुनेशची हत्या
कुटुंबीयांनी नक्षलवाद्यांच्या भीतीपायी या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली नाही आणि मुनेशचे अंत्यसंस्कार करण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी गावाजवळ एक बॅनर लावले आणि त्यामध्ये मुनेशला पोलिसांचा मुखभिर असल्याचे सांगत त्याला गद्दार असे सांगण्यात आले आणि त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. आता पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट रोजी मुनेशने नक्षल स्मारकावर अभिमानाने राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा व्हीडीओ ही पोलिसांपर्यंत पोहोचला असून राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे मुनेशची हत्या करण्यात आली आहे का या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू असल्याची माहिती कांकेरचे पोलीस अधीक्षक कल्याण एलीसेला यांनी दिली आहे. संपूर्ण भारतात स्वातंर्त्यदिनी राष्ट्रीय ध्वज प्रत्येक नागरिक अभिमानाने फडकावत असताना त्याच भारतात बस्तर क्षेत्रातील मागास आणि नक्षलवाद्यांच्या दहशत असलेल्या गावांमध्ये कशा पद्धतीने कायद्याची आणि संविधानाची पायमल्ली नक्षलवाद्यांकडून केली जाते याचा हा अत्यंत दुर्दैवी वाईट आणि लाजिरवाणा प्रसंग म्हणावा लागेल.

