मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याची जबाबदारी आता आमदार झिशान सिद्दीकी यांच्या खांद्यावर आली आहे. पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याकडे राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या दोन्ही नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबईत पक्षाची संघटना मजबूत करणं, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी करणं, अशी महत्त्वाची कामे आता झिशान सिद्दीकी यांना करावी लागणार आहेत.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याची गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होती. याआधी समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होतं. त्यानंतर मुंबई विभागात सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे हे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आता झिशान सिद्दीकी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मुंबई राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळाला आहे. मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी पक्षाचे इतर नेते आणि पदाधिकारीही उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठी जबाबदारी
झिशान सिद्दीकी हे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मे २०२६ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. आता त्यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाचीही जबाबदारी आली आहे. त्यामुळे पक्षातील आपले स्थान अधिक मजबूत करण्यासोबतच मुंबईतील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
















