२० लोकसभा खासदारांची गुप्त बैठक!
कोलकाता : वृत्तसंस्था
आमदारांपाठोपाठ आता तृणमूल काँग्रेसचे खासदारही ममता बॅनर्जी यांना सोडण्याच्या तयारीत आहेत. बंडखोर खासदारांच्या गटाचे नेतृत्व काकोली घोष या करीत असून, त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन त्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे. बंडखोर खासदारांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर राय यांनी पक्ष आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर सुखेंदू यांनी सुमारे २० लोकसभा खासदारांसोबत एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीचा एक फोटो समोर आला असून, त्यात शर्मिला सरकार, प्रसून बॅनर्जी, कालीपदा सोरेन, जगदीश बसुनिया आणि अरूप चक्रवर्ती दिसत आहेत. टीएमसीचे लोकसभेत २८ आणि राज्यसभेत १३ खासदार आहेत. अलीकडील घडामोडींनुसार बंगालमधील ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे. त्यातच आता तृणमूलचे लोकसभेचे २८ पैकी २० खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे तृणमूलसाठी हा मोठा धक्का आहे.
सुखेंदू यांनी सांगितले की, पक्षातील अनेक सदस्य मनमानीपणे पक्ष चालवत होते. त्यामुळे आपण राजीनामा दिला. दरम्यान, बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जी म्हणाले की, सुखेंदू यांचे विधान ब-याच अंशी बरोबर आहे. सुखेंदू शेखर यांच्या राजीनाम्यासंदर्भात बंगालचे विरोधी पक्षनेते ऋतब्रता बॅनर्जी म्हणाले की, ही केवळ सुखेंदू यांची वैयक्तिक बाब नाही. मी त्यांच्याशी सहमत आहे. सुखेंदू यांनी नवनिर्वाचित भाजप सरकारची प्रशंसा करत म्हटले की, ते आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार राज्याच्या विकासासाठी पावले उचलत आहेत.
पुन्हा निवडून
येऊन दाखवा
खा. महुआ मोईत्रा बंडखोर खासदारांना फटकारले असून, तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर जे खासदार जिंकून आले, त्यांना मिळालेली मते ही एनडीएसाठी नव्हती. तुम्ही आता राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकिटावर निवडून या. बघू किती मोठे हिरो आहात तुम्ही, अशा शब्दांत महुआ मोईत्रा यांनी ट्विट केले.
















