नागपूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही लोकांनी दबाव टाकला होता, असा धक्कादायक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे.
नागपुरात बोलताना त्यांनी हा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अनिल देशमुख यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना श्याम मानव यांनी केलेल्या सर्व आरोपांत पूर्णपणे तथ्य असून आपल्याकडे याचे सर्व पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर आपण हे सर्व पुरावे सादर करू असेही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत अनिल देशमुख यांना त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बोलवले होते. याठिकाणी अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचा जबाब तपास यंत्रणांकडे द्या, यासाठी अनिल देशमुख यांच्यावर काही लोकांनी सातत्याने दबाव टाकला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव टाकला गेला, यासंदर्भात श्याम मानव यांनी धक्कादायक दावे केले आहेत.
अनिल देशमुख यांनी तपास यंत्रणांच्या चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावे विविध खोट्या प्रकरणात सांगितली तर ईडीच्या प्रकरणातून स्वत:ची सुटका करू, अशी थेट ऑफरच अनिल देशमुखांना देण्यात आली होती,असेही श्याम मानव यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख गृहमंत्री होते. १०० कोटी वसुली प्रकरणावरून त्यांना अटकही करण्यात आली. तुरुंगात असताना या प्रकरणातून सुटका करून घ्यायची असेल तर १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचे नाव घ्या, दिशा सालीयन बलात्कार आणि हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घ्या, अशी अनिल देशमुखांना तुरुंगात ऑफर देण्यात आली होती. पण अनिल देशमुखांनी तसे केले नाही.
त्याशिवाय अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर बोलवून गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधींची कमाई करून द्यावी, असाही जबाब तपास यंत्रणांना देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. पण अनिल देशमुखांनी तसेही करण्यास नकार दिला. त्यानंतरही अजित पवारांना अडकवायचे नसेल तर किमान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांची नावे सांगून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवा, अशीही ऑफर देण्यात आली होती, असा दावा श्याम मानव यांनी केला.