लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे बनावट बिस्कीट विक्रीचा बहाणा करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी खिसेकापू व चोरी करणारे सराईत तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व बनावट सोन्याचे बिस्कीट असा ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनात पोउपनि प्रमोद देशमुख यांचे पथक तपास करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार औसा-लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात तीन व्यक्ती सोन्याचे डुप्लीकेट बिस्कीट विक्रीसाठी ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबले असल्याची माहिती मिळताच पथकाने खात्री करून घटनास्थळी छापा टाकून बाबाराव सूर्यकांत जाधव (वय ३०), केशव छगन जाधव (वय ५०), संदीप दगडू जाधव (वय २९) तिघे रा. सलगरा ता. लातूर) यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मनी मंगळसूत्र, रोख रक्कम तसेच सोनेरी रंगाचे डुप्लीकेट बिस्कीट मिळून आले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी फसवणूक व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी महिलांना ‘सोन्याचे बिस्कीट’ देण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याचे सांगितले. तसेच बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या खिशातील व पिशवीतील रोख रक्कम चोरी केल्याचेही निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींकडून गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव व एमआयडीसी पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील एकूण १ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम, २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत ३ लाख ३० हजार रुपये तसेच बनावट सोन्याचे बिस्कीट असा ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपी संदीप दगडू जाधव हा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर व चाकूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे हजर करण्यात आले आहे.
















