नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिस-या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यानंतर मंगळवारी अर्थसंकल्पानंतर सीआयआयच्या कॉन्फरन्समध्ये संबोधित करताना आपल्या तिस-या कार्यकाळातच भारत जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताची अर्थव्यवस्था ८ टक्क्यांच्या दराने वाढत आहे. भारत जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल आणि तो दिवस आता दूर नाही असे मोदी म्हणाले.
कोरोना महासाथीचा सामना केल्यानंतर आम्ही आता भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे. आमच्या सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात बजेटचा आकार तिपटीने वाढून ४८ लाख कोटी रुपये झाला आहे असे पंतप्रधान मोदी संबोधित करताना म्हणाले. कॅपिटल एक्सपेंडिचर १० वर्षांमध्ये पाच पटींनी वाढून ११.११ लाख कोटी रुपयांच्या पार गेला. गेल्या १० वर्षांमध्ये मंत्रालयांच्या वाटपात विक्रमी वाढ केली आहे, तर कराचे दर विक्रमी नीचांकी पातळीवर आल्याचेही त्यांनी नमूद केले.
कमी महागाई असलेला एकमेव देश
सरकार ज्या वेगाने आणि ज्या पातळीवर पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे ते अभूतपूर्व आहे. उच्च विकास दर आणि कमी महागाई असलेला भारत हा एकमेव देश आहे आणि जागतिक विकासात भारताचा वाटा १६ टक्के आहे. गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. जीवन सुलभ करणे, कौशल्य विकास, रोजगार यावर आमचा भर आहे असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
उत्पादन क्षेत्राचे चित्र बदलले
गेल्या १० वर्षांत उत्पादन क्षेत्राचे चित्र बदलले आहे. कोट्यवधी रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्यामुळे एमएसएमई क्षेत्रावर आमचे अधिक लक्ष आहे. आज भारतात १.४० लाख स्टार्टअप्स आहेत आणि ८ कोटी लोकांनी मुद्रा लोनद्वारे आपला व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
गुंतवणूकदार भारतात येण्यास इच्छुक
जगभरातील गुंतवणूकदार भारतात येण्यास इच्छुक आहेत. उद्योगासाठी ही सुवर्णसंधी असून आपण ती गमावली नाही पाहिजे. एक गरीब देश म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण २०४७ मध्ये विकसित देश म्हणून आपण आपला १०० वा स्वातंत्र्यदिन साजरा करू.