26.9 C
Latur
Sunday, July 20, 2025
Homeसोलापूरथकबाकी वसुलीसाठी शेतीपंपांची वीज खंडित

थकबाकी वसुलीसाठी शेतीपंपांची वीज खंडित

सोलापूर-जिल्ह्यात पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर आता वीज महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेचा दणका बसू लागला आहे. साडेसात अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या शेतीपंपधारक शेतकऱ्यांची वीज थेट खंडित केली जात आहे. यामुळे खरीप हंगामात शेतीपिकांना पाणीपुरवठा करणे अशक्य बनले असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे परिसरात वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा रोहित्र स्तरावरूनच बंद केला. यामुळे अनेक शेतकरी विजेविना पिके वाचवण्यासाठी हतबल झाले आहेत.

भीमा नदीकाठचा भंडारकवठे परिसर सध्या पाण्याने भरलेला आहे. मात्र वीज नसल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. सध्याच्या उन्हाच्या झळा, आणि दीड महिन्यापासून पडलेली पावसाची ओढ यामुळे खरीप पिकांची स्थिती आधीच नाजूक आहे. त्यातच वीज खंडित झाल्याने सोयाबीन, बाजरी, उडीद, मका अशा पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक आठवड्यांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने बियाणे उगवलेले नाहीत, किंवा कोवळी पिके जळत चालली आहेत. अशा परिस्थितीत पाण्याची अत्यंत गरज असताना वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.

आमच्याकडे सध्या रोख रक्कम नाही, फक्त कर्ज आणि आशा आहे. अशी कारवाई थांबवली नाही, तर शेतकरी पुन्हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर येतील, अशी संतप्त प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने व्यक्त केली.

शेतकरी संघटनांनी वीज महावितरणच्या या कारवाईचा निषेध करताना सांगितले की, किमान खरीप हंगाम संपेपर्यंत वीज खंडित न करता समुपदेशनाद्वारे वसुली करावी. दुष्काळजन्य परिस्थितीत ही मोहीम राबवणे ही शेतकऱ्यांवरील अन्यायकारक पळवाट आहे. त्याचबरोबर शासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन वीज खंडित करण्याची मोहीम तत्काळ स्थगित करावी आणि शेतकऱ्यांना सवलतीच्या वसुलीच्या योजना जाहीर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपधारकांना सध्या मोफत वीजपुरवठा दिला जात आहे. मात्र साडेसात अश्वशक्तीच्या पुढील वीज कनेक्शन धारक शेतकऱ्यांकडून थकबाकीच्या ३०-४० टक्के रकमेची वसुली करण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही वसुली मोहीम राबवली जात असल्याचे वीज महावितरणचे म्हणणे असले तरी, सध्याच्या हवामान व शेतीच्या स्थितीचा विचार करता ही वेळ अयोग्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR