रेणापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाने मोर्चे, आंदोलन शांततेत पार पाडले आहेत. ही लढाई जिंकण्यासाठी एकजूट महत्वाची आहे. एकजुटीमुळेच सरकार हतबल झाले आहे. काही नेते मंडळी वेगवेगळया पद्धतीने ही एकजूट मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, तुम्ही एकजूट ठेवा, आरक्षण कसे मिळवायचे ते मी बघतो, असे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले . पाचव्या टप्यातील रेणापूर पिपंळफाटा येथे शुक्रवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. त्यावेळी बोलताना जरांगे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आतापर्यंत सरकारचे वेळोवेळी ऐकले आहे. सुरुवातीला ४० दिवस त्यानंतर दोन महिने देवूनही दिलेला शब्द पाळला जात नसेल तर आमचाही नाईलाज असल्याचे म्हणत आरक्षण घेतल्याशिवाय आत एक इंचही मागे सरकणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, ७० वर्षांपूर्वीच हा समाज ओबीसी आरक्षणात होता. मात्र काहींनी यापासून वंचित ठेवले. त्यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले. पण आता आरक्षणाची लढाई अंतिम टप्यात आहे. आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या मागासलेपण आणि शासकीय नोंदी या दोन्ही बाबी पूर्ण झाल्या आहेत. असे असताना देखील सरकारकडून वेळकाढूपणा केला जात आहे. सरकारचे धोरण समाजाच्या लक्षात आले असून आरक्षण घेतल्याशिवाय आता समाज मागे हाटणार नाही. राज्यात ५४ लाख मराठा बांधवांची कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. यापेक्षा अजून काय पुरावे द्यावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवाय मुंबईकडे जाण्याचा निर्णय झाला नसताना देखील पोलीस प्रशासनाकडून नोटीसा बजावल्या जात आहेत. हे दुर्दैव असून याची किंमतही सरकारला मोजावी लागेल. पोलीस प्रशासन केवळ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत आहेत. त्यामध्ये त्यांची काही चूक नाही.
प्रत्येक ठिकाणी समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित राहत आहे. या काही सभा नाहीत तर मराठा समाजाच्या वेदना आहेत. त्यामुळे सरकारने मनाची नाही किमान जनाची तर बाळगावी. आपला हट्टीपणा सोडून समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात यापेक्षा समाजाला वेगळे असे काहीच नको. कायद्याची शपथ घेवून सत्तेत असलेल्या मंत्र्याकडूनच कायदा मोडण्याची भाषा केली जात आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना समज देतो, असे सांगितले होते. पण अजून ही त्यांची बेताल वक्तव्ये सुरूच असल्याचे म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला केला शिवाय १२०० स्वयंसेवक नियुक्ती करण्यात आली होती.