सोलापूर : महापालिकेचे असलेले दोन चार्जिंग सेंटर बंद अवस्थेत असून, इलेक्ट्रिक बाईकस्वारांना ती ओढतच घरी आणावी लागते. इंधनमुक्त भारत आणि प्रदूषण कमी करण्याचा एकीकडे प्रयत्न तर दुसरीकडे चार्जिंग सेंटरकडे पाहण्यासाठी पालिकेला वेळ नसल्याच्या प्रतिक्रिया वाहनधारकांमधून ऐकावयास मिळत आहे.
सोलापूर शहर हे केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत आले. यामुळे या योजनेत सहभागी झाल्याने शहराचा कायापालट होईल असे नागरिकांना वाटत होते. पण काही भाग सोडला तर इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारे स्मार्ट सिटीचा प्रभाव दिसून येत नाही.
अनेक ठिकाणी सोलर प्लॅन्ट लावण्यात आले आहेत. पण त्याचा वापर सुरू नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा,यामुळे प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने मनपाने इलेक्ट्रिक चार्जिंग पाईंट उभारले.
पण याच्या देखभालीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळाले.सोलापूर महानगरपालिकेच्या उजव्या बाजूच्या गेट जवळील फुटपाथवर हे चार्जिंग सेंटर उभारण्यात आले आहे. येथे दोन चार्जिंग पॉईंट आहेत. या चार्जिंग पॉईंटला असलेले फ्युजही काढण्यात आले आहे. जर एखाद्या नागरिकाच्या वाहनाला चार्जिंग करायचे असल्यास तेथे चार्जिंग करता येणार नाही, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.