मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदाला मुंबई उच्च न्यायालयाने ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
या अंतरिम आदेशात न्यायालयाने पतंजलीला कापूर उत्पादने न विकण्यास सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने सांगितले की, पतंजलीने जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा पतंजलीचा हेतू होता यात शंका नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन पतंजलीला कापरापासून बनवलेल्या उत्पादनांची विक्री थांबवण्यास सांगितले होते. दरम्यान, मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने पतंजलीवर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान पतंजलीने कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. मात्र, पतंजली ही अत्यंत श्रीमंत कंपनी असून तिला मनमानी करू दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने सांगितले की, आदेश जारी असतानाही पतंजली केवळ उत्पादनच विकत नाही तर त्याचे उत्पादनही करत आहे. उच्च न्यायालयाने पतंजलीला दोन आठवड्यांत चार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने पतंजलीला ५० लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ऑगस्ट २०२३ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलीला कापरापासून बनवलेल्या उत्पादनांची विक्री आणि जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा अंतरिम आदेश जारी केला होता. मंगलम ऑरगॅनिक्सच्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला आहे. मात्र पतंजलीने या निर्णयाचे उल्लंघन केले.