नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरकरन व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान दि. २७ रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत मध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यास थकीत कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याने मनपास करच्या माध्यमातून पावणे चार कोटी रूपयांची लॉटरी लागली.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी महापालिकेचे मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत नोटीस बजावल्या होत्या. त्यानुषंगाने दि. २७ रोजी सकाळी १०.३० वा. पासून प्रशासकीय इमारतीमध्ये लोक अदालतीस सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, न्यायाधिश अर्जुन बी. जाधव (पॅनल प्रमुख) यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या. यानंतर मालमत्ता धारकांच्या तक्रारीचे निरसन केले. या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये एकूण ११३५ मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सुट योजनेचा लाभ घेवुन एकुण ३ कोटी ६९ लाख १,२४८ रुपये एवढा मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह न्यायाधिश अर्जुन बी. जाधव (पॅनल प्रमुख), अॅड.पी.बी. वाघमारे, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त (महसुल) स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त (कर) सदाशिव पतंगे, मनपाच्या सहा क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव, डॉ.मिर्झा फरहतुल्लाह बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, निलावती डावरे, न्यायालयीन कर्मचारी एस.व्ही. शेटकार, सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
ज्या मालमत्ता धारकांनी मनपा मालमत्ता कराचा भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणा-या जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मालमत्ता धारकांना केले असुन या लोक अदालतीच्या आयोजनासाठी उपयुक्त स.अजितपालसिंघ संधु व कर विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.