केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट संकेत, इंधन दरवाढही होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत नुकतीच वाढ झालेली असताना येणा-या काळात गॅस आणखी महाग होणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि पुरवठा साखळीतील अडथळ््यांमुळे एलपीजी गॅसच्या किमतींवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या वाढत्या महागाईवर सरकारची बाजू स्पष्ट करताना आगामी काळात पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरचे दर आणखी वाढू शकतात, असे स्पष्ट केले. गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे आम्हालाही दु:ख आणि खेद आहे. मात्र, यावर टीका करण्यापूर्वी लोकांनी जगातील सद्यस्थिती समजून घेतली पाहिजे. सध्या संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. जगभरात मालाची वाहतूक आणि पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, असे ते म्हणाले.
एलपीजी गॅस आता अत्यंत मर्यादित ठिकाणांवरून उपलब्ध होत आहे. गॅसची मूळ किंमत वाढली आहे. शिवाय माल एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आता तब्बल ४० ते ४५ दिवस लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि विम्याचा खर्च कमालीचा वाढला आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या अडचणींबाबत तितकेच चिंतीत आहोत. परंतु सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत गॅसच्या किमती वाढविणे हा सरकारचा नाईलाज झाला असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.
गृहिणींचे बजेट कोलमडले
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कालच म्हणजेच ७ जून रोजी प्रतिसिलिंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली. या आधी २ महिन्यांपूर्वी याच गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० रुपये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दोन महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडर तब्बल ९० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यासोबतच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही मोठ्या प्रमाणात विढविण्यात आल्या आहेत.
उज्ज्वला योजनेत
४ गॅसच मिळणार
केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला केवळ ४ सिलिंडरवरच सबसिडी मिळणार आहे. पूर्वी या योजनेतील ग्राहकांना वर्षाला ९ गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. आता सरकारने सबसिडीवाल्या सिलिंडरच्या संख्येत कपात केली असून, आता केवळ चारच गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली. त्यावेळी १२ गॅस सिलिंडर मिळत होते.
















