22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरअंमली पदार्थ बनविणारी फॅक्टरी; परप्रांतीयासह शेतक-यांवर गुन्हा

अंमली पदार्थ बनविणारी फॅक्टरी; परप्रांतीयासह शेतक-यांवर गुन्हा

लातूर : प्रतिनिधी
मौजे गुंजरगा, ता. निलंगा शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये अंमली पदार्थ बनवून त्याची विक्री करणा-या तिघा परप्रांतीयांसह येथील शेतक-यांविरूद्ध औराद शहाजानी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजरगा, ता. निलंगा येथील एका शेतक-याने अंमली पदार्थ बनविणा-या तिघा जणांना आपल्या शेतातील शेड भाड्याने दिले होते. तिघा परप्रांतीयांकडून नशा येईल अशा पद्धतीचे अंमली पदार्थ बनविण्यात येत होते. येथेच अंमली पदार्थ बनवून त्याची परिसर व इतर ठिकाणी विक्रीही करण्यात येत होती.
अशा पद्धतीचे अंमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर मानवाच्या जीवितास धोकाही निर्माण होतो. मात्र, या तिघांनी गेल्या काही दिवसांपासून या शेडमध्ये अंमली पदार्थ बनवून त्याची विक्री करीत असल्याचे लक्षात येताच औराद शहाजानी पोलिसांनी या शेतातील शेडमध्ये चालू असलेल्या अंमली पदार्थ बनविण्याच्या फॅक्टरीवर धाड टाकली. तेंव्हा तेथून त्यांनी ४० लिटर रसायनाचे मिश्रण ५०० ग्रॅम पांढ-या रंगाची पावडर, ९०० ग्रॅम पांढर रंगाचा घट्ट पदार्थ आढळून आला.  या पत्र्याच्या शेडमध्ये विविध केमीकल व पदार्थांच्या माध्यमातून अंमली पदार्थ बनवून त्याची विक्री करण्यात येत होती. त्यांच्याकडे आढळून आलेले ३१ हजार रूपये हे अशा पदार्थाच्या विक्रीतून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
औराद शहाजानी पोलिसांनी या प्रकरणी मलय्या हानमय्या गुत्तेदार रा. पुणे, मलय्या शिवय्या गुत्तेदार रा. गुलबर्गा, दर्शन हनमय्या गुत्तेदार रा. शिरसागी, जि. कलबुर्गी (कर्नाटक) व यांना पत्र्याचे शेड मारून अवैधरित्या अंमली पदार्थ बनविण्याच्या फॅक्टरीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल राजू उर्फ व्यंकट गोरोबा गोबाडे रा. अनसरवाडा यांच्या विरोधात भादंवि २७३, ३२८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ग्रामीण भागात अशा पद्धतीने परप्रांतीयांकडून जागा भाड्याने घेवून त्या ठिकाणी अंमली पदार्थ बनविण्याच्या या फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केल्यानंतर या ठिकाणी असे अवैध स्वरूपाचे कृत्य होत असल्याचे परिसरातील नागरिकांना निदर्शनास आले. तसेच ३१ हजार रूपयांचा नोटा, ४ हजार रूपयांची चिल्लर, मोबाईल असा एकूण ९४ हजार ८८० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR