23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरअखेर मांजरा धरण जोत्याखाली 

अखेर मांजरा धरण जोत्याखाली 

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह बीड व धाराशिव जिल्ह्यातील जवळपास २१ विविध पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणीसाठा अखेर जोत्याखाली गेला आहे. उपयुक्त पाणीसाठा शुन्यवर असून लातूर शहराला येत्या काळात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता आहे ते पाणी पाऊस पडेपर्यंत काटकसरीने वापरणे आवश्यक आहे.
लातूर जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठे धरण आहेत. तावरजा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ, मसलगा, घरणी हे आठ मध्यम प्रकल्प, १३४ लघू प्रकल्प, असे एकुण १४४ प्रकल्प आहेत. लातूर शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मांजरा धरणाची प्रकल्पीय क्षमता १७६.९६२ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणात सद्य:स्थितीत उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी शुन्यावर आली आहे. निम्न तेरणा धरणाची प्रकल्पीय क्षमता ९१.२२१ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणातीलही उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आहे. आठ मध्यम प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा १२२.१५५ दशलक्ष घनमीटर असून या आठ प्रकल्पांत २.९०० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. १३४ लघू प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३१४.२६६ दशलक्ष घनमीटर आहे. या लघू प्रकल्पांत सद्य:स्थितीत २१.३९२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. एकुण १४४ प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ७०४.६०५ दशलक्ष घनमीटर आहे. सद्य या १४४ प्रकल्पांमध्ये २१.२९३ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणेज ३.४५ टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा नाही. ७५ टक्केपेक्षावर पाणीसाठा फक्त एका लघू प्रकल्पात आहे. पाच लघू प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. सहा लघू प्रकल्पांत २५ ते ५० टक्के पाणीसाठा असून ४ मध्यम, २८ लघू अशा ३२ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली पाणीसाठा आहे. मोठे २, मध्यम ४, लघू ७७ असे एकुण ८१ प्रकल्प जोत्याखाली आहेत. ११ लघु प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत.  लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आल्याने लातूर शहरालाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR