पुणे : एकेकाळी पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र याठिकाणी भोसरी आणि चिंचवड भागात भाजपाचे आमदार आहेत. तर पिंपरी मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. म्हणजे पूर्णपणे महायुतीचे वर्चस्व पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याचे दिसून येते. मात्र यंदा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून स्वत: लक्ष दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मोठी इनकमिंग होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणितं बदललेली आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. या निकालानंतर शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी जाऊन शेतक-यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या शहराध्यक्षांसह १६ माजी नगरसेवकांनी शरद पवारांची मोदी बागेत भेट घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी याअगोदर अजित पवारांची भेट घेऊन पुढील राजकारणासाठी शरद पवार यांच्याबरोबर जाणे योग्य असल्याची भूमिका मांडली. तुम्ही फार घाई करताय असे अजित पवारांनी सांगितल्यानंतरही या नेत्यांनी शरद पवारांची मोदी बागेत भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील अन्य नगरसेवकही तुतारी फुंकणार असल्याची माहिती आहे.