मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत वाटाघाटी करताना पक्षाची ताकद आणि जिंकून येण्यासारख्या जागा सोडून दिल्या आणि निवडून न येणा-या जागा घेऊन तडजोड केल्याची खंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील एका गटाने बोलून दाखविल्याचे सांगितले जात आहे. साता-याच्या जागेचा आग्रह होता. तिथे राष्ट्रवादीची ताकद मोठी होती. परंतु ती जागा भाजपला दिली. त्यावरून पक्षातील नेते नाराज आहेत. तसेच परभणी, गडचिरोली, नाशिकची जागाही राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची होती. मात्र, या जागा मित्रपक्षाला दिल्या. नाशिकची जागा तर केवळ आग्रही भूमिका न घेतल्याने घालवली असल्याचाही आरोप होत आहे. सध्या उघडपणे त्यावर कुणी भाष्य करीत नसले तरी खाजगीत नाराजी बोलून दाखविली जात आहे.
ब-याच मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना केवळ महायुतीतील घटक पक्षांच्या दबावाला बळी पडून अजित पवार यांनी महत्त्वाच्या जागा घालवल्या आणि पडतील अशा जागा पदरात पाडून घेतल्या, असा पक्षांतर्गत सूर उमटला आहे. केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल जागावाटपाचा निर्णय घेत असल्यामुळे अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाशिकवरून सुरु झालेला नाराजीचा सूर पक्षांतर्गत वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर चर्चा
नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी आग्रह धरला होता. तसेच ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी तयारीही सुरू केली होती. परंतु कोणताही निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त करीत अखेर माघार घेतली. त्यामुळे त्यांच्याही नाराजीची चर्चा सुरू झाली असून, खुद्द भुजबळ यांनीच केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी माझे नाव निश्चित केलेले असतानाही उमेदवारी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याचे समोर आले.