25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार गटात अस्वस्थता?

अजित पवार गटात अस्वस्थता?

नरहरी झिरवळांनी केले शरद पवारांचे कौतुक

नाशिक : अजित पवार गटामध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटामध्ये अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीमध्ये ४ जागांमध्ये केवळ २ जागांवर अजित पवार गटाला यश आले. त्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते अजित पवार गटावर नाराज असून महायुतीला पुनर्विचार करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी देखील शरद पवार यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे झिरवळ देखील परतीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे. झिरवळ म्हणाले, कोण कोणत्या वाटेवर आहे हे माहिती नाही पण असं होणार नाही. दादांची कामकाजाची पद्धत वेगळी आहे. साहेबांचे (शरद पवार) काम मोठे आहे. साहेबांनी आत्तापर्यंत केले ते दुसरे कोणी करणारही नाही. साहेबांसारखे काम भविष्यातही कोणी करणार नाही, असे मत नरहरी झिरवळ यांनी मांडले. त्यांनी शरद पवार यांच्या कामाचे कौतुक केल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र सोबतच, असे असले तरी युवा नेतृत्व म्हणून अजित दादांकडे पाहिले जाते त्यामुळे आमदार जाणार नाहीत, असे देखील झिरवळ यांनी ठामपणे सांगितले आहे.

तसेच आज नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फ्लॅक्सवरून चर्चांना आणखी उधाण आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरातीवर शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. मात्र हे पोस्टर कार्यकर्त्यांनी लावले असल्याचे बोलत झिरवळ यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR