नागपूर : प्रतिनिधी
सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला इतक्या जागा हव्या, तितक्या जागा हव्या, अशा चर्चा घडवण्यात येत आहेत. पक्ष वाढविण्याची ही वेळ नाही. दोन-चार जागा कमी निवडून येतील. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याऐवजी मोदींची सत्ता कशी जाईल, यासाठी एकत्र येऊन प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे फालतू चर्चा बंद करून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील, यासाठी प्रयत्न करा. कारण पुन्हा मोदी निवडून आल्यास तिहार कारागृहात जाण्याची तयारी ठेवा, अशी भीती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नागपुरात सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या मनुस्मृती दहन दिनानिमित्त स्त्री मुक्ती दिन परिषदेचे कस्तुरचंद पार्कवर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, उपाध्यक्ष निशा ठाकूर, प्रा. अंजली आंबेडकर, ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांच्यासह वंचितच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीचा धागा पकडत आंबेडकर म्हणाले की, वंचितच्या उमेदवारांनी इतर कोणत्याही गोष्टींचा फारसा विचार न करता केवळ लोकसभा निवडणुकीत विजय कसा मिळवता येईल, याचाच विचार करावा. जागा वाटप, किती जागांवर लढणार याची चर्चा करण्यापेक्षा उमेदवारांनी त्यांना निवडणूक कशीह्यािकता येईल, यासाठी प्रयत्न करावा. मग मते पैसे मोजून घ्यावी लागली, मैत्री करून मिळवावी लागली तरी चालतील. पण जास्तीत जास्त मते मिळतील, यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न करावे. येणा-या काळात जर फुले-शाहू-आंबेडकरवाद ही विचारसरणी लोकसभेत पोहोचवायची असेल तर निवडणूक जिंकण्याची खुणगाठ बांधा, असा सल्ला आंबेडकर यांनी यावेळी दिला.
इंडियासोबत जाण्याचे संकेत
इंडिया आघाडीचा भाग नसलेले आंबेडकर यांनी यावेळी आघाडी सोबत जाण्याचे सुतोवाच करताना मोदीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडियाची स्थापना केली. मात्र, अजूनही ते पूर्णपणे एकत्र आलेले नाही. मी यापूर्वीही म्हटले आहे, मोदीला घालवायचे असेल तर आधी एकत्र या, कसे लढायचे यासाठी आम्ही आमचा भेजा देतो ना, असे सांगत इंडियासोबत जाण्याचे संकेत दिले.
…तर एकत्र या
मोदींना पुन्हा देशावर राज्य करू द्यायचे नसेल तर एकत्र येणे, संघटित होऊन लढणे हाच एकमेव उपाय असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. स्त्री मुक्ती परिषदेत रेखा ठाकूर, लीलाताई चितळे, अंजली आंबेडकर यांचीही भाषणे झाली.