23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा

अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा

पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती. त्यावेळी त्यांनी थेट अनिल देशमुख यांचे नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवले आहे. याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलिस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्यातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्हही विधानसभा अध्यक्षांना दिला होता. या प्रकरणी आता अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा नोंद केला.

भाजपच्या दडपशाहीविरुद्ध
लढण्याची बांधली खूणगाठ
जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. अशा दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता मी भाजपच्या या दडपशाहीविरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, ते जनतेने बघावे, असे अनिल देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR