17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeराष्ट्रीयअपघातांतील जखमींवर आता कॅशलेस ट्रिटमेंट

अपघातांतील जखमींवर आता कॅशलेस ट्रिटमेंट

दीड लाखापर्यंत मदत, केंद्रीयमंत्री गडकरींची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस ट्रिटमेंट योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दीड लाख रुपये दिले जाणार आहेत किंवा जखमींचा ७ दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

दिल्लीतील भारत मंडपममध्ये सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी या योजनेची घोषणा केली. यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहकार्य वाढविणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. ही योजना लागू करण्याची जबाबदारी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) यांच्याकडे असेल. मार्च २०२५ पासून ही योजना देशभरात लागू केली जाणार आहे. दरम्यान, संसदेच्या आगामी अधिवेश्नात मोटार वाहन सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
आम्ही अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस ट्रिटमेंट योजना सुरू केली आहे. त्यानुसार महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणआर आहे किंवा त्यांच्या ७ दिवसांच्या उपचाराचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांच्या आत पोलिसांना अपघाताची माहिती देणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

प्रायोगिक तत्त्वावर
सुरू केली होती योजना
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयाने १४ मार्च २०२४ रोजी रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार प्रदान करण्याची पायलट योजना सुरू केली होती. ही योजना ६ राज्यांत लागू करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता आगामी मार्चपासून ही योजना देशभरात लागू केली जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

हिट अ‍ॅण्ड रनमधील
मृतांना २ लाखांची मदत
एकीकडे अपघातात जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दीड लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करतानाच हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत केली जाणार असल्याचेही गडकरी यांनी जाहीर केले. अपघातग्रस्तांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना संकट काळात केंद्राची मदत मिळणार असल्याने रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. गडकरी यांच्या या घोषणेचे कौतुक होत आहे.

गतवर्षी अपघातात १ लाख
८० हजार लोकांचा मृत्यू
२०२४ मध्ये रस्ते अपघातात देशात १ लाख ८० हजार लोकांचा मृत्यू झाला. यातील ३० हजार मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाले आहेत तर ६६ टक्के मृत्यू १८ ते ३४ वयोगटातील आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले. यासोबतच शाळा किंवा महाविद्यालयासमोर वाहतूक नियोजन नसल्याने दरवर्षी जवळपास १० हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो, असेही ते म्हणाले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला सरकार प्राधान्य देत आहे, असे गडकरी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR