23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

अमरावती : प्रतिनिधी
विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस, असा राष्ट्रीय स्तरावरील थेट मुकाबला रंगल्याने मतमोजणीच्या उंबरठ्यावर सुद्धा विजयाबाबत फिफ्टी-फिफ्टीचे गणित लावले जात आहे.
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ १९९६ साली शिवसेनेने त्यांच्याकडून हिसकावून घेतला. परंतु १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र, २००४ ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात राहिला. २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थनावर हा मतदारसंघ जिंकला.

यंदा त्या भाजपच्या उमेदवार असल्याने त्यांनी धोका दिल्याची भावना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये होती. त्याचेच प्रतिबिंब या निवडणुकीच्या मतदानात दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. त्याचाच फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे उचलतील काय, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे अमरावती, तिवसा तसेच दर्यापूर या तीनही विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे.

तर अचलपूर व मेळघाटात प्रहारचे आमदार आहेत. बडनेरा मतदारसंघ युवा स्वाभिमानचे रवी राणा यांच्या ताब्यात आहे. मात्र बडनेरा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्याने तसेच हा मतदारसंघ अर्धा शहरी असल्याने मतदार कुणाला कौल देतात याची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांच्या रूपात उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. दिनेश बूब कुणाची जास्त मते घेतात यावर सुद्धा उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह यंदाच्या निवडणुकीत असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत एकाही ठिकाणी भाजपचा आमदार नाही. नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते फारसे सक्रिय नव्हते, अशी कुजबूज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR