लातूर : प्रतिनिधी
अरविंद राजेभाऊ खोपे (रा. पांगरी, ता. परळी) या इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा दि. २९ जुलै रोजी जेएसपीएम संचलित येथील जुन्या एआयडीसीतील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात संशयास्पद मृत्यू झाला. अरविंदच्या शवविच्छेदनाचा अहवाल अरविंदच्या पालकांना दि. ८ ऑगस्ट रोजी मिळाला. या अहवालात अनेक शंकास्पद नोंदी आहेत. त्यानुसार संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करावेत, अशी पालकांची मागणी आहे; परंतु स्थानिक पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अरविंदचे वडील राजेभाऊ खोपे व काही समाजबांधवांनी शुक्रवारी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची नांदेड येथे भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (जेएसपीएम) संचलित स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद राजेभाऊ खोपे याचा संशयास्पद मृत्यू झाला. अरविंदच्या संशयास्पद मृत्यूविषयी या संस्थेतील कर्मचा-यांनी अरविंदच्या पालकांना दिलेली माहिती आणि अरविंदच्या शवविच्छेदन अहवालातील नोंदी यात विसंगती असल्याचे अरविंदच्या पालकांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवालातील नोंदीनुसार संशयित आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अरविंदचे पालक व समाजबांधवांनी केली मात्र स्थानिक पोलिसांकडून त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. यामुळे अरविंदचे वडील राजेभाऊ खोपे, फिर्यादी सहदेव गणपती तरकसे, नातेवाईक व समाजबांधवांनी नांदेडला जाऊन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन अरविंदच्या संशयास्पद मृत्यूचे संपूर्ण प्रकरण मांडले. या प्रकरणी पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.
तसेच अरविंद खोपे, मयत सायली सिद्धार्थ गायकवाड, रा. नायगाव, ता. चाकूर, मयत आकाश व्यंकट सातपुते रा. भुसणी, ता. औसा, सचिन शिवाजी सूर्यवंशी रा. देवणी, विनोद पंढरी कांबळे रा. शिरूर अनंतपाळ, बालाजी शेषेराव कांबळे रा. शिरूर अनंतपाळ यांच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यात नोंद आहे. या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी करावी, या संदर्भाने दलित समाजाचे नेते चंद्रकांत चिकटे, मोहन माने, युथ पँथर संघटनेचे पदाधिकारी, यशपाल कांबळे यांनी पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या.