नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दिल्लीसह देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.
मी येत्या दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असून जोपर्यंत जनता आपला निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नुकतेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहा महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने त्यांच्यावर अनेक बंधने देखील घातली आहेत.
अशातच आता त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवाय केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
मी आता जनतेच्या न्यायालयात : केजरीवाल
केजरीवाल म्हणाले, मी आता जनतेच्या न्यायालयात आलो आहे. तुम्ही मला गुन्हेगार मानता की इमानदार? आता मी दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी घराघरांत आणि गल्ली-बोळात जाईन, जोपर्यंत जनतेचा निकाल येत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.