लातूर : प्रतिनिधी
परळी तालुक्यातील पांगरी येथील अरविंद राजेभाऊ खोपे या इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा दि. २९ जुलै रोजी जेएसपीएम संचलित येथील जुन्या एआयडीसीतील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात मारहाण करुन खुन करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, या मागणीचे निवेदन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना युथ पॅथर संघटनेच्या वतीने देण्यात आले.
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संचलित स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद राजेभाऊ खोपे याचा मारहाण करुन खुन करण्यात आला. सदर खुनाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हावा याकरीता आपल्यास्तरावरुन सीआयडीमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच लातूर शहर व जिल्ह्यात दलितांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराची प्रकरणेही यावेळी मांडण्यात आली. यावेळी युथ पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे, संस्थापक उपाध्यक्ष सिद्धार्थ कवठेकर, प्रवक्ता प्रताप कांबळे, जिल्हाध्यक्ष धनराज कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख विदेश सोमवंशी व पीडित कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.