नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने अरुणाचल प्रदेशातील एका शिखराला नाव दिल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. आता भारत आणि चीन यांच्यातील टेन्शन पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. खरे तर, भारताने अरुणाचल प्रदेशातील एका शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. चीनने शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले, व्यापक दृष्टीने बोलायचे झाल्यास, जांगनानचा प्रदेश हा चीनचा प्रदेश आहे आणि भारताने चीनच्या भूभागात तथाकथित अरुणाचल प्रदेश स्थापन करणे बेकायदेशीर आणि अवैध आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अॅडव्हेंचर स्पोर्ट्सच्या टीमने अरुणाचल प्रदेशातील २०,९४२ फूट उंच असलेल्या आणि नाव नसलेल्या शिखरावर यशस्वी चढाई केली. यानंतर संघाने या शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.
‘एनआयएमएस’ संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि अरुणाचल प्रदेशातील दिरांगमध्ये स्थित आहे. शिखराचे नामकरण करण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सहाव्या दलाई लामा यांचे नाव शिखराला देणे, ही त्यांचे योगदान आणि बुद्धीला आदरांजली आहे. सहावे दलाई लामा, त्सांगयांग ग्यात्सो यांचा जन्म १६८२ मध्ये मोन तवांग प्रदेशात झाला होता.