नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला. आजवर त्यांनी प्रत्येकवेळी अर्थसंकल्प सादर करताना देशांतर्गत कला-संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन त्यांनी साडीच्या माध्यमातून घडविले. २०१९ ते २०२४ पर्यंत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कोणकोणत्या रंगाची साडी नेसली होती, त्याचा हा गोषवारा.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (शनिवारी) मधुबनी आर्टची साडी नेसली. पद्मश्री दुलारी देवींनी त्यांना ही साडी भेट म्हणून दिली आणि बजेटच्या दिवशी ही साडी नेसण्याचा आग्रह केला होता त्यांचा आग्रह आज त्यांनी पूर्ण केला. २०२१ मध्ये दुलारी देवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आंध्रप्रदेशात पांढ-या रंगाची रेशमी आणि जांभळ्या रंगाच्या बॉर्डरची साडी नेसली होती.
२०२४ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कांथा डिझाईनची निळ्या आणि क्रीम रंगाची साडी नेसली होती. ही साडी पश्चिम बंगालमध्ये बरीच प्रसिद्ध आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३ मध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना लाल रंगाची साडी नेसली होती. ही साडी कर्नाटकमधील धारवाड भागातील हाताने विणलेली इरकल रेशमी साडी होती.
२०२२ मध्ये अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पादरम्यान ओडिसाच्या विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ब्राऊन रंगाची बोमकाई साडी नेसली होती. ही साडी सर्वसाधारणपणे ओडिसामध्ये तयार केली जाते.
२०२१ मधील अर्थसंकल्पात सीतारमण यांनी लाल आणि क्रीम कलरची पोचमपल्ली साडी नेसली होती. ही साडी हैद्राबादमधील पोचमपल्ली गावातील आहे. २०२१ चा अर्थसंकल्प खास होता. या वेळी पहिल्यांदा अर्थसंकल्पाची प्रत लाल रंगाच्या कव्हरमध्ये आणण्यात आली होती.
२०२० मध्ये अर्थमंत्र्यांनी पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. आपल्या देशात पिवळा रंग शुभ मानला जातो. २०१९ मध्ये निर्मला सीतारमण यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पादरम्यान गोल्डन बॉर्डरची गुलाबी मंगलगिरी साडी नेसली होती.