बुलडाणा : प्रतिनिधी
सत्तेतील लोकांनी अतिशय विनम्र राहायला हवे. सरकारच्या भरवशावर तुम्ही जिवंत आहात. शेतक-यावर जर कोणी दादागिरी करत असेल, अर्वाच्च भाषेत बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मंत्री तानाजी सावंत यांना दिला आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना एका शेतक-याने प्रश्न विचारताच त्यांनी शेतक-याची औकातच काढली. सुपारी घेऊन कार्यक्रमात उभे राहून बोलायचे नाही, औकातीत राहून बोलायचे, अशी दमबाजी तानाजी सावंत यांनी शेतक-याला केली. याच घटनेवर संताप व्यक्त करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तानाजी सावंत यांना चांगलेच सुनावले,
रविकांत तुपकर म्हणाले की, हे अतिशय दुर्दैवी आहे. सत्तेतील लोकांनी अतिशय विनम्र राहायला हवे. सरकारच्या भरवशावर तुम्ही जिवंत आहात. शेतक-यावर जर कोणी दादागिरी करत असेल, अर्वाच्च भाषेत बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आम्ही त्या नेत्याला धडा शिकविणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच शेतक-यांसाठी अॅट्रॉसिटीसारखा कायदा आणला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
डोंगरवाडी गावात पालकमंत्री तानाजी सावंत यांचा गाव संवाद दौरा सुरू होता. यावेळी तानाजी सावंत गावामध्ये बंधा-याच्या कामाविषयी सांगत होते. गावक-यांनी बंधा-यास गेट बसवून प्रश्न मिटणार नाहीत, असे म्हणताच तानाजी सावंत गावक-यांवर संतापले. खाली बसा आपण विकासाचे बोलायला आलो आहोत. मी इंजिनीअर आहे टेक्निकल आहे. एखाद्याची सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. आम्हालाही कळतं कोणाची तरी सुपारी घ्यायची, उभा राहून बोलायचे आणि चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा. आम्हीही उडत्याची मोजतो. आपापल्या औकातीत राहून बोलायचं, औकातीत राहून विकास करायचा, असे म्हणत तानाजी सावंत यांनी ग्रामस्थांना दम दिला होता.