मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडच्या १२ जणांच्या चमूने अवघ्या ७२ तासांत दोन हिमशिखरांना गवसणी घालण्याची कामगिरी केली. त्यामध्ये लडाख क्षेत्रातील ‘कांग यात्से’ या शिखरजोडींचा समावेश आहे. ६ हजार मीटरहून अधिक उंचीची ही शिखरे आहेत. ही शिखरे गाठून त्यांनी विक्रम नोंदविला आहे. त्यामुळे या चमूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पश्चिम नौदल कमांडचा हा चमू ३० ऑगस्टला लडाख येथे पोहोचला होता. ३ दिवस वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर त्यांनी चढाई सुरू केली. एकेक टप्पा गाठत त्यांना पुढील तीन दिवस या दोन्ही हिमशिखरांच्या पायथ्याशी पोहोचायचे होते. मात्र, यादरम्यान वातावरण खराब होण्यास सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा, मध्येच पाऊस, हिमवादळ यामुळे मोहिमेत अडथळा आला. चढाई हळूवार होऊ लागली. त्यामुळे बेस कॅम्पवरूनच परत यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र ‘कांग यात्से १’ व ‘कांग यात्से २’, हे दोन्ही शिखर सर करण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्या जोरावर त्यांनी या दोन्ही शिखरांवर चढाई करीत विक्रम नोंदविला. त्यामुळे नौदलाच्या या चमूचे कौतुक होत आहे.
यादरम्यान सर्व संकटांवर मात करून हा चमू १२ सप्टेंबरला ६४५० मीटर उंचीवरील ‘कांग यात्से १’वर पोहोचला. शिखर सर केल्याचा आनंद साजरा करून अर्धे अंतर खाली उतरून थोडी विश्रांती घेतल्यानंतर ‘कांग यात्से २’वर जायचे होते. त्यादरम्यान वातावरण काहिसे चांगले झाले. दृष्यमानता सुधारली. ही संधी हुकू नये, यासाठी चमूने आराम न करता आधी ६२०० मीटर उंचीवरील ‘कांग यात्से २’कडे कूच केली व १५ सप्टेंबरला ते शिखरही यशस्वीरित्या सर केले. अशाप्रकारे केवळ ७२ तासांत दोन शिखरांना गवसणी घालण्याचा आगळा विक्रम या चमूने नोंदवला.
भारतीय नौदलाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. एकीकडे सागरी संरक्षण करताना बरेच नौदलातील सैनिक आपले आगळेवेगळे छंद जोपासतात. तसेच धाडसी उपक्रम राबवितात. उंचच उंच शिखर सर करण्याचा विक्रम नोंदविणे सोपी गोष्ट नाही. परंतु नौदलाच्या चमूने ही विशेष कामगिरी नोंदवली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.