26.8 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeसंपादकीयअश्रूंची झाली फुले!

अश्रूंची झाली फुले!

भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने मंगळवारी भारतीय क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला! सरबज्योतच्या साथीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई करताना मनूने एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. असा पराक्रम करणारी मनू स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात १९०० मध्ये नॉर्मन पिचार्ड या धावपटूने २०० मीटर आणि २०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकांची कमाई केली होती. त्याने त्यावेळी भारताकडून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. मात्र, तो भारतीय नव्हता! तरीही भारताचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता म्हणून त्याचेच नाव घेतले जाते. दोन दिवसांपूर्वी वैयक्तिक नेमबाजी प्रकारात कांस्यपदक मिळविल्यानंतर मनू मंगळवारी मिश्र सांघिक गटात पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहिली. मनू-सरबज्योत जोडीने कोरियाच्या ली वोनोहो आणि ओह ये जिन या जोडीचा १६-१० असा पराभव केला. देशातील महिला खेळाडू आणि नेमबाजांसाठी मनूने केलेला हा डबल धमाका ही एक मोठी उपलब्धी आहे.

अर्थात सरबज्योतसाठीही हे पदक खास ठरले. कुमार गटापासून आपल्या कामगिरीत चमक दाखविणा-या सरबज्योतने ऑलिम्पिक स्पर्धेच्या पदार्पणात शनिवारी वैयक्तिक पदकासाठी शिकस्त केली होती. मात्र, त्याला ५७७ गुणांसह नवव्या स्थानावर राहावे लागले. मिश्र गटातील यशाने त्याच्या या निराशेवर फुंकर घातली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल खराब झाल्याने शेवटच्या क्षणी माघार घ्यावी लागल्याने निराश झालेल्या मनूच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या होत्या. मात्र, या निराशेवर मात करत व भूतकाळाच्या कुठल्याही कटू स्मृतीचे दडपण न घेता एका दिवसाच्या अंतराने एकाच स्पर्धेत दोन पदकांची कमाई करण्याची ऐतिहासिक कामगिरी करून मनूने आपल्या अश्रूंची फुले केली आहेत! या ऐतिहासिक कामगिरीसह मनूने अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत. ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत एअर पिस्तूल प्रकारात पदक प्राप्त करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

मनू भाकर-सरबज्योत सिंग ही जोडी ऑलिम्पिक स्पर्धेत मिश्र गटात पदक प्राप्त करणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक प्रकारात पदक प्राप्त करणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर एकाच प्रकारात दोन पदके प्राप्त करणारी दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी अशी कामगिरी पी. व्ही. सिंधूने केली होती. अर्थात या ‘डबल धमाक्या’वर मनूची ऑलिम्पिक मोहीम संपलेली नाही. तिला आता तिच्या आवडत्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात अशीच धमाकेदार कामगिरीची आस असणार! आज (२ ऑगस्ट) ती २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीला सुरुवात करणार आहे. या प्रकारात मनूने आणखी सरस कामगिरी करून भारतासाठी आणखी एक पदक पटकवावे हीच भारतीय क्रीडा रसिकांची मनोमन अपेक्षाही आहे आणि प्रार्थनाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरल्यावर एकापेक्षा जास्त प्रकारात एकाचवेळी सहभागी होणे तिला झेपणारे नाही, अशी टीका झाली होती. मंगळवारी आपल्या ऐतिहासिक कामगिरीने मनूने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत उतरणे व पदक प्राप्त करणे हे किती अवघड असते याचा अनुभव आजवर अनेक भारतीय खेळाडूंनी घेतलेलाच आहे. त्यातही एका प्रकारात पदक प्राप्त करून अवघ्या २४ तासांच्या अंतराने दुस-या प्रकारात उतरणे व तेथेही पदक पटकाविणे हे आणखी अवघड काम! हे अवघड काम मनू भाकरने फत्ते करून दाखविले असल्याने तिची कामगिरी विशेष अभिनंदनीय ठरते. ही कामगिरी करताना मागच्या अपयशाच्या कटू स्मृतींचे दडपण बाजूला सारून कामगिरीत कमालीची एकाग्रता साधणे यासाठी शरीराबरोबरच मनाचीही जोरदार तयारी करावी लागते. ती करण्यात मनू यशस्वी ठरली आणि म्हणूनच तिच्या अश्रूंची फुले झाली! मनूच्या या ऐतिहासिक कामगिरीने १४० कोटी भारतीयांनाही प्रचंड मोठा आनंद दिला आहे. तिच्यावर होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावातून तो व्यक्त होतोच आहे. ‘मनूने इतिहास रचला. तुझ्या कामगिरीने देशाचा गौरव वाढला. आणखी मोठ्या कामगिरीसाठी तुला शुभेच्छा’, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनूचे कौतुक केले.

मनूने केलेल्या पदकांच्या डबल धमाक्याने भारताने ऑलिम्पिक पदक तालिकेत २९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. मनूने मिश्र गटातील पदकाचे श्रेय सरबज्योतला दिले आहे. सरबज्योतने विजयी गुण मिळवला, त्यामुळेच आम्हाला कांस्यपदक पटकाविता आले, अशी प्रतिक्रिया मनूने दिली. आता मनूचे संपूर्ण लक्ष २५ मीटर पिस्तूल प्रकारावर केंद्रित आहे. ‘शेवटच्या स्पर्धेसाठी मी नक्कीच सर्वोत्तम कामगिरीचा पूर्ण प्रयत्न करेन. मात्र, मी आणखी एक पदक जिंकू शकले नाही तर कृपया नाराज होऊ नका,’ असे आवाहन मनूने देशवासियांना केले आहे. अर्थात तिचे आवाहन भारतीयांना मनस्वी पटले असले तरी मनूने तिसरे पदक प्राप्त करून भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण अध्याय लिहावा, हीच प्रत्येक भारतीयाची मनोमन इच्छाही आहे आणि सदिच्छाही! तसे ही इच्छा व सदिच्छा केवळ हवेतील नाही तर त्यामागे ठोस कारणही आहे.

२५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने २०२२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केलेले आहे. तर २०२३ मध्ये याच स्पर्धेत मनूने या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते. त्यामुळे मनू या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण अध्याय नक्कीच लिहिणार अशीच सर्वांना अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण झाल्यास भारतासाठी तो एक अत्यंत गौरवाचा क्षण असेल! ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी दर स्पर्धेगणिक उंचावत चालली आहे. ही भारतीयांसाठी गौरवाची व अभिमानाचीच बाब आहे. देशात हळूहळू का असेना पण क्रीडा संस्कृती तयार होण्यास व रुजण्यास सुरुवात झाली आहे, हे ही नसे थोडके! मनूला ‘ट्रिपल धमाक्या’ साठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR