मानवत : येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनीसमोर अश्लिल भाषेत बोलून त्यांना विनाकारण छडीने मारहाण करण्यात येत असल्याची तक्रार मुख्याध्यापिका छाया गायकवाड यांनी मानवत पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तक्रार पेटीत टाकलेल्या चिठ्या देखील पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या तक्रारीवरून प्राथमिक शिक्षक दत्ता गंगाधर होगे (वय ४५) रा. मानवत यांच्या विरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून तो फरार असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील जिल्हा परिषद शाळेत मागील ४ ते ५ महिन्यापासून निर्भया पथक भेट देवून गुट टच, बॅड टच तसेच कोणी त्रास देते का, अश्लील बोलत आहेत का याची विचारणा करून मार्गदर्शन करीत असतात. तसेच शाळेत एक तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे. दि.१ ऑक्टोबर रोजी निर्भया पथक पोलिस अंमलदार शकुंतला चांदीवाले व सय्यद फयाद यांनी शाळेत येवून वर्ग ८वीच्या वर्गाला भेट दिली असता तेथील काही विद्यार्थी, विद्यार्थीनींनी शिक्षक होगे यांच्या विरूध्द तक्रार असल्याचे सांगून शाळेच्या तक्रार पेटीत तक्रार लिहून टाकल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
त्यानंतर शिक्षीका प्रियंका दुमाने व शिपाई संजय गिरी तसेच पोलीसासह तक्रार पेटी उघडली असता त्यात काही विद्यार्थ्यांनी शिक्षक होगे अश्लील भाषेत बोलत असल्याचे चिठ्या टाकल्याचे आढळून आले. त्यानंतर मुख्याध्यापिका गायकवाड व पोलिसांनी ८ वी वर्गात जावून विद्यार्थ्यांकडे चिठ्या बाबत चौकशी केली असता त्यांनी शिक्षक होगे अश्लिल भाषेत बोलून छडीने मारत असल्याचे सांगितले. याबाबत वरीष्ठांना माहिती देवून मानवत पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिका गायकवाड यांनी तक्रार दिली.
या तक्रारीत दि.१३ सप्टेंबर ते दि.१ ऑक्टोबर या कालावधीत शिक्षक होगे यांनी ८वी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थीनीसमोर अश्लिल भाषेत बोलून त्यांना विनाकारण छडीने मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या सोबत विद्यार्थ्यांनी तक्रार पेटीत टाकलेल्या ६ चिठ्या देखील जोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी शिक्षक होगे याच्या विरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.