बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील अंचरवाडी शिवारात आकाशातून एक वेगळेच यंत्र पडल्याने, ते बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली. सध्या अनेक गावांत रात्री ड्रोनची दहशत असतानाच हे वेगळेच यंत्र समोर आले. त्यावरील मजकूरही वेगळ्या भाषेत असल्याने खळबळ उडाली.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील अंचरवाडी शिवारात आकाशातून एक वेगळेच यंत्र पडल्याचे गावक-यांच्या लक्षात आले. एका शेतात हे यंत्र पडले. या यंत्रावर काही मजकूर लिहिल्याचे समोर आले. ही भाषा परिचित नसल्याने गावक-यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. बघ्यांनी हे यंत्र नेमके कशाचे आहे? यावरून खल केला. दरम्यान पोलिसांनी हे यंत्र ताब्यात घेतले आहे.
शेतकरी संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहेत. सोमवारी दुपारी परिहार हे मुलगा अविनाश आणि चुलत भाऊ वैभव यांच्यासोबत शेतात आले होते. त्यावेळी त्यांना फुग्याला बांधलेले हे संयंत्र, उपकरण दिसले. त्यांनी ही माहिती गावातील ज्येष्ठांना दिली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी उसळली. ही माहिती पोलीस आणि महसूल विभागाला मिळाली. त्यांनी याठिकाणी धाव घेतली. त्या उपकरणावर कोरियन भाषेतील मजकूर दिसून आला. हे संयंत्र हवामानासंबंधीचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण हे यंत्र इतक्या दूरवर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता याची माहिती समोर न आल्याने त्याचे गूढ वाढेल आहे.