22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रआता फक्त दाऊद इब्राहिमला ‘क्लीनचिट’ देणे बाकी

आता फक्त दाऊद इब्राहिमला ‘क्लीनचिट’ देणे बाकी

खा. संजय राऊत यांची सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी
शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी ‘क्लीनचिट’ दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने गैरसमजातून वायकरांवर गुन्हा दाखल केला होता, असा हास्यास्पद दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. यावरून सरकारवर तिखट शब्दात टीका करताना, आता फक्त दाऊद इब्राहिमला क्लीनचिट देणे बाकी राहिले, असा सणसणीत टोला ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू झाली होती. चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. जेलमध्ये जायचे की सत्ताधा-यांसोबत एवढाच पर्याय आपल्या पुढे उपलब्ध होता, असे स्वत: वायकर यांनी कबूल केले होते. वायकर यांना शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली व ते निवडूनही आले आहेत. आता त्यांना भूखंड घोटाळा प्रकरणी क्लीनचिट मिळाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर तिखट शब्दात टीका केली. ते म्हणाले, आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीनचिट द्यायची बाकी आहे. सत्ताधारी पक्ष सर्व ओवाळून टाकलेल्या भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेत आहेत. त्यांना पक्षात घेऊन आमची ताकद किती वाढली हे सांगतात. ज्या लोकांवर ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. ते नंतर सत्ताधा-यांसोबत गेले. त्यात वायकरही आहेत. ईडी आणि सीबीआयला घाबरून ते पळून गेले. आता त्यांना क्लीनचिट दिली आहे. मोदी आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये दुसरे काय होऊ शकते? अशी टीका संजय राऊत यांनी केली.

खोटे गुन्हे दाखल करून
दबाव टाकण्याचा प्रकार
आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे काही लोक घाबरून त्याच्याकडे जातात. हे सरकार भ्रष्टाचारी आपल्याकडे घेत असून आमची ताकद वाढल्याचे सांगत आहेत, अशी टीका राऊतांनी महायुती सरकारवर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR