दुबई : वृत्तसंस्था
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव केला. यासह किवी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना ९ मार्च रोजी दुबईमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता हा सामना सुरू होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
मिचेल सँटनर आणि रोहित शर्मा १:५५ वाजता नाणेफेकीसाठी येतील आणि नाणेफेक दुपारी २:०० वाजता होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले, ज्यामध्ये भारताचा वरचष्मा आहे. यात टीम इंडियाने ६१ सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडच्या संघाने ५० सामने जिंकले. या स्पर्धेत भारताने साखळी फेरीत न्यूझीलंडला पराभूत केले होते. दुबई स्टेडियमची खेळपट्टी संथ असेल. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय असेल.