28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रआम्ही शांत बसलोय, असे कुणी समजू नका!

आम्ही शांत बसलोय, असे कुणी समजू नका!

५९ दिवसांनंतर धनंजय मुंडे कडाडले

बीड : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दमानियांचा उल्लेख त्यांनी बदनामिया असा करत केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी त्या काम करत असल्याची टीकाही मुंडे यांनी केली. आम्ही शांत बसलो आहोत, असे कुणी समजू नका, असा इशाराही मुंडेंनी दिला.

दमानिया यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मुंडे यांनी कृषिमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याला मुंडे यांनी पत्रकार परिषदेतूनच सडेतोड उत्तर दिले. त्यांनी दमानियांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणारे धादांत खोटे आरोप असल्याचे म्हटले आहे. स्वत:ची प्रसिध्दी आणि दुस-याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही मुंडे म्हणाले.

आम्ही शांत बसलो आहोत, असे कुणी समजू नका. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही, असे समजू नये. मीडियामध्ये यायचे, स्वत:चा प्रभाव निर्माण करणे तसे काही अवघड नाही. पाच वर्षे विरोधी पक्षनेता होतो, असा पलटवार मुंडे यांनी दमानियांवर केला.

बीड जिल्ह्यात संवेदनशील घटना घडली आहे. वादाला वाद नको म्हणून आम्ही शांत बसतोय. एक विषय झाला की दुसरा विषय. माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम दमानिया यांना ज्यांनी कुणी दिले असेल, त्यांना व दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप साप म्हणून भुई थोपटणे आणि मीडिया ट्रायल करून सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवणे योग्य नसल्याची टीकाही मुंडेंनी केली.

प्रसिध्दीसाठी खोटे आरोप
आज ५९ वा दिवस आहे, माझ्यावर, बीड, एक गाव, एका समाजावर मीडिया ट्रायल सुरू आहे. दमानियांनी बीड जिल्ह्याला, जनतेला, बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या बुध्दीची कीव करावी का? जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला असे म्हणतात, हा खोटेपणा नाही का? त्यांनी केलेला एकही आरोप कुठेतरी टिकलाय का? असे धादांत खोटे आरोप करू नका. कदाचित त्यांना राजकारणात यायचे असेल, म्हणून प्रसिध्दीसाठी हे करत असतील, असे टीकास्त्र मुंडेंनी सोडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR