17.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्या‘आयएएस’ हंसचे मनी लॉड्रिंग; महाराष्ट्रासह पाच राज्यात धाडी

‘आयएएस’ हंसचे मनी लॉड्रिंग; महाराष्ट्रासह पाच राज्यात धाडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने ३ डिसेंबर रोजी पाच राज्यातील १३ ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. दिल्ली, गुडगाव, कोलकाता, जयपूर आणि नागपूर शहरात मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. या प्रकरणी ईडीने यापूर्वी पाटणा, दिल्ली, कोलकाता, पुणे, मुंबई या शहरांसह हरयाणा आणि पंजाबमध्येही धाडी टाकल्या होत्या.

बिहारमधील आयएएस अधिकारी संजीव हंस आणि इतर व्यक्तींविरोधात ही छापेमारी करण्यात आली. आयएएस अधिकारी संजीव हंस आणि त्यांचे सहकारी, रिअल इस्टेट आणि सेवा क्षेत्रातील इतर व्यक्तींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या.

आयएएस अधिकारी असलेल्या संजीव हंस यांनी बिहार प्रशासनात विविध पदांवर कार्यरत असताना भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे कमावले. गुलाब यादव आणि इतर सहका-यांनी यात संजीव हंस यांची मदत केली. भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेला काळा पैसा पांढरा करून देण्यात या लोकांनी आयएएस संजीव हंस यांची मदत केली. याच प्रकरणात आता ईडीने कारवाई सुरू केली असून, ३ डिसेंबर रोजी १३ ठिकाणी छापेमारी केली.

संजीव हंस यांच्या एका जवळच्या सहका-याच्या (जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे) कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे डिमॅट खाती उघडण्यात आली. या खात्यातून ६० कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्यात आले, अशी माहिती ईडीने छापे टाकल्यानंतर केलेल्या चौकशीतून समोर आली.

त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या ७० बँक खात्यांची माहिती तपासातून समोर आली. यातून उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती लपविण्यासाठी या बँक खात्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. रिअल इस्टेटमध्ये जवळपास १८ कोटी रुपये गुंतवले असून, रोख रक्कमेच्या स्वरूपात हा पैसा दिल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत.

ईडीने ६० कोटी रुपयांचे शेअर असलेले डिमॅट खाते आणि इतर ७० बँकांतील खाती गोठवली आहेत. त्याचबरोबर इतर १६ ठिकाणांहून १६ लाख रुपयांचे परदेशी चलन आणि २३ लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. भ्रष्टाचार केल्यासंदर्भातील अनेक पुरावे ईडीला सापडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR