बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्रिय असलेले मनोज जरांगे पाटील अजून अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात एवढी मोठी क्रूर हत्या झालेली असताना देशमुख यांच्या आरोपींना मोक्का लावणे आवश्यक होते. त्यांना ३०२ मध्ये घेणेही आवश्यक आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे धाबे दणाणले आहे. राज्यातील जनता आणि देशमुख कुटुंबीयांच्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली आहे. एसआयटीने कराडचा ताबा घेतला असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडची संतोष देशमुख हत्या प्रकरणातही चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
चार्जशीटमध्ये फेरफार नको
फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, खंडणीच्या गुन्ह्यातही मोक्का असला पाहिजे. ३०२ मध्येही मोक्का असला पाहिजे. त्याने अनेक प्रकार घडवून आणलेले आहेत. जागा बळकावणे, मा-यामा-या करणे, चो-या करणे, छेडछाडी करणे यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्याला मोक्का लागला पाहिजे, असे सांगतानाच तपास करताना चार्जशीटमध्ये हेराफेरी व्हायला नको. याची गृहमंत्रालयाने काळजी घ्यावी, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.